ज्येष्ठ नेत्यांच्या बंडखोरीमुळे 'राजस्थान की रानी तेरी खैर नही'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 06:19 AM2018-11-13T06:19:38+5:302018-11-13T06:21:30+5:30
अनेकांचे बंड : एकछत्री कारभारामुळे वसुंधराराजेंविषयी नाराजी
सुहास शेलार
जयपूर : पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी केलेली बंडखोरी, एकछत्री कारभारामुळे स्वपक्षीयांची नाराजी, विरोधकांचा हल्लाबोल आणि निवडणूकपूर्व सर्वेक्षणांनी काँग्रेसला बहुमत मिळण्याचा वर्तवलेला अंदाज पाहता राजस्थानमध्ये मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्यासाठी ‘रानी तेरी खैर नहीं’ असेच म्हणण्याची वेळ आली आहे.
राजस्थानमध्ये २०१३ साली भाजपाने २०० पैकी १६३ जागा जिंकून एकहाती सत्ता स्थापन केली. वसुंधराराजे मुख्यमंत्री झाल्या. मात्र सत्तेच्या किल्ल्या हाती येताच त्यांनी एकछत्री कारभार सुरू केला. मंत्रिमंडळ होते, पण ते नावापुरतेच. राजेंच्या संमतीशिवाय इथे ‘पत्ता’ देखील हलत नव्हता. त्यामुळे पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. पक्षातील ज्येष्ठ नेते घनश्याम तिवारी यांनी फारकत घेतली भारत वाहिनी पक्ष स्थापन केला. त्यानंतर भाजपाच्या संस्थापक सदस्यांपैकी असलेल्या जसवंतसिंह यांचे पुत्र आ. मानवेंद्रसिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता भाजपचे नेते हनुमान बेनिवाल यांनी राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाची स्थापना केली आहे. त्यामुळे या बंडखोरीचा भाजपाला निवडणूकीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी-अमित शाह यांना जुमानत नसल्याने वसुंधराराजेंवर भाजपाची केंद्रीय कार्यकारिणीही नाखूश आहे. त्यामुळे उमेदवार निवडण्याचे थेट अधिकार वसुंधराराजेंकडे न देता निवडणूक प्रभारी प्रकाश जावडेकर यांच्या देखरेखीखाली १५ ज्येष्ठ नेत्यांची टीम तयार केली होती. या टीमने जिल्हावार प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना भेटून अहवाल तयार केला होता.
एका मतदारसंघातून केवळ एका उमेदवाराची निवड न करता दोन ते तीन उमेदवारांची नावे यादीत समाविष्ट केली होती. त्यानंतर सोमवारी भाजपाने १३१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात २५ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, विद्यमान ८५ आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. राजस्थानमधील एकंदरीत स्थिती पाहता वसुंधराराजे यांची वाट बिकट असल्याचेच चित्र आहे. राजस्थानात ७ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. ११ डिसेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
पद्मावत चित्रपटाचा परिणाम
मानवेंद्रसिंह यांनी ‘कमल का फूल, मेरी भूल’ असा नारा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राजपुतांची मते काँग्रेसकडे वळतील, अशी आशा काँग्रेसला आहे. पद्मावत प्रकरणात वसुंधराराजे सरकारने घेतलेल्या भूमिकेमुळे राजपूत समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे हा समाज ‘राजे’ सरकारवर नाराज आहे. पश्चिम राजस्थानातील जवळपास ५३ मतदारसंघांत राजपूत समाजाचा मोठा प्रभाव आहे. या मतांच्या जोरावर काँग्रेस निवडणुकीला सामोरे जात आहे. निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून काँग्रेसला बहुमत मिळणार असल्याचे निष्कर्ष आल्याने भाजपा जपून पावले टाकत आहे. त्याचा फायदा घेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट व ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी भाजपाला घेरण्यास सुरवात केली आहे.
सर्वेक्षणातील अंदाज
काँग्रेस भाजपा बसपा इतर
टाइम्स नाऊ-सीएनएक्स ११० ते १२० ७० ते ८० १ ते ३ ७ ते ९
इंडिया टीव्ही-सीएनएक्स ११५ ७५ २ ८
आज तक १३० ५७ - १३
एबीपी - सी व्होटर्स १४२ ५६ - २