नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसला रामराम केलेले माजी वनमंत्री राजीव बॅनर्जी यांच्यासह काही बंडखोर आमदार आणि नेत्यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेऊन भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. त्यानंतर आज (रविवारी) अमित शाह यांच्या हावडा रॅलीत दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी होत पश्चिम बंगालच्या जनतेला संबोधित केले.
पश्चिम बंगालमध्ये आम्हाला डबल इंजिन असलेले सरकार हवे आहे. सोनार बांगलासाठी केंद्रात आणि राज्यात म्हणजेच पश्चिम बंगालमध्ये भाजपचेच सरकार असणे गरजेचे आहे, असे भाजप नेते राजीव बॅनर्जी यांनी सांगितले. हावडा रॅलीत सुवेंदू अधिकारी यांनीही सहभागी होत तृणमूल काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली.
तृणमूल कॉंग्रेस खासगी मर्यादित कंपनी
तृणमूल कॉंग्रेस आता पक्ष नसून खासगी मर्यादित कंपनी आहे, अशी टीका सुवेंदू अधिकारी यांनी केली. २८ फेब्रुवारीपर्यंत खासगी लिमिटेड कंपनी रिकामी होईल. तेथे कोणीही उरणार नाही, असा दावाही सुवेंदू अधिकारी यांनी यावेळी केला.
अमित शाह यांचाही हल्लाबोल
ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात पश्चिम बंगालची वाटचाल अधोगतीकडे झाली. राज्याचा विकास करण्याचं सोडून ममता बॅनर्जींमुळे पश्चिम बंगाल अन्य राज्यांच्या तुलनेत मागे पडले, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. विधानसभा निवडणुकाची चाहूल लागताच तृणमूल काँग्रेसमधील अनेक बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. निवडणूक निकालानंतरही हे चित्र असेच राहील. शेवटी ममता बॅनर्जी एकट्या पडतील, असा दावा शाह यांनी केला.
"ममता बॅनर्जींच्या कार्यकाळात पश्चिम बंगालची अधोगतीकडे वाटचाल"; अमित शाह यांची टीका
बंगालमध्ये रामराज्य स्थापन होणार : स्मृती इराणी
पश्चिम बंगालमध्ये रामराज्य स्थापित होणार आहे. दीदी यावेळी तृणमूल काँग्रेस सत्तेतून पायउतार होणार आहे आणि भाजप सत्तेत येणार आहे. पहिल्यांदा कोणत्या नेत्याने कट मनी स्वीकारले. हे सरकार तांदूळ आणि डाळ चोर आहे. दीदींनी कोरोना महासाथीतही महापाप केले आहे, अशी टीका स्मृती इराणी यांनी केली.