नवी दिल्ली : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना चित्रपटातील योगदानासाठी दादासाहेब फाळके पुरस्काराने सोमवारी गौरविण्यात आले. ‘मनिकर्णिका’ व ‘पंगा’ या चित्रपटातील भूमिकांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून कंगना राणावत यांना सन्मानित करण्यात आले. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार ‘भोसले’ या चित्रपटासाठी मनोज बाजपेयी व ‘असुरन’मधील भूमिकेसाठी धनुष यांना प्रदान करण्यात आला.
६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची यंदा मार्च महिन्यात घोषणा करण्यात आली होती. २०१९ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठीचे हे पुरस्कार होते. हा पुरस्कार सोहळा गेल्या वर्षीच होणे अपेक्षित होते. मात्र कोरोना साथीमुळे पुुढे ढकलण्यात आलेला हा सोहळा सोमवारी दिल्लीत पार पडला. हे पुरस्कार उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते देण्यात आले.
सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्रियदर्शन यांच्या ‘मरक्कर : लायन ऑफ दी अरेबियन सी’ या मल्याळी चित्रपटाला देण्यात आला. विवेक अग्निहोत्री यांच्या ‘दी ताश्कंद फाइल्स’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संवादासाठीचा पुरस्कार मिळाला. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा मान दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची भूमिका असलेल्या ‘छिछोरे’ या चित्रपटाने मिळविला आहे.
पल्लवी जोशी, सावनी रवींद्र यांचाही सन्मान‘बार्डो’ चित्रपटातील ‘रान पेटलं’ या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून सावनी रवींद्र हिला पुरस्कार मिळाला. ‘दी ताश्कंद फाइल्स’साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार पल्लवी जोशी यांना पुरस्कार मिळाला. ‘आनंदी गोपाळ’ला सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. विशेष उल्लेखनीयमध्ये ‘लता भगवान करे’, ‘पिकासो’ सह आणखी काही चित्रपटांना पुरस्काराने गौरविले गेले.