रजनीकांत उतरणार तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात, उद्या करणार मोठी घोषणा
By बाळकृष्ण परब | Published: November 29, 2020 08:12 PM2020-11-29T20:12:33+5:302020-11-29T20:16:41+5:30
Rajinikanth News : तामिळनाडूतील राजकारणात भूकंप घडवून आणणाऱ्या घडामोडीचे संकेत मिळत आहेत. दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत हे तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
चेन्नई - पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळे तामिळनाडूमध्ये सध्या राजकीय वारे जोरात वाहत आहेत. सत्ताधारी अण्णा द्रमुक भाजपाच्या मदतीने राज्यातील आपली सत्ता कायम राखण्यास प्रयत्नशील आहे. तर विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकनेही सत्तेत पुनरागमन करण्यासाठी कंबर कसली आहे. त्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतीलराजकारणात भूकंप घडवून आणणाऱ्या घडामोडीचे संकेत मिळत आहेत. दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत हे तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली असून, रजनीकांत हे सोमवारी याबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.
रजनीकांत यांनी आपल्या राजकारणातील प्रवेशाबाबत मोठे विधान केले आहे. रजनीकांत हे सोमवारी आपल्या रजनी मक्कल मंडरम या पक्षाच्या जिल्हा सचिवांसोबत चर्चा करणार आहेत. या चर्चेमध्ये रजनी हे पुढची विधानसभेची निवडणूक लढवणार की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र ही बैठक ऑनलाइन होणार की प्रत्यक्ष होणार हे निश्चित झालेले नाही, असे रजनी यांच्या टीममधील सूत्रांनी सांगितले आहे.
रजनीकांत यांनी सांगितले की, मी रजनी मक्कल मंडरममधील सदस्यांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर योग्य वेळी आपल्या राजकीय भूमिकेची घोषणा करेन. रजनीकांत हे गेल्या दोन वर्षांपासून राजकीय मुद्द्यांवर सक्रिय झालेले आहेत. मात्र आतापर्यंत त्यांनी राजकारणामध्ये अधिकृतरीत्या प्रवेश केलेला नाही. गेल्या वर्षी दक्षिणेतील अजून एक सुपरस्टार कमल हसन यांनी रजनीकांत यांच्यासोबत मिळून काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर दोघांच्याही पक्षात आघाडी होण्याचे वृत्त समोर आले होते.
दरम्यान, केंद्रातील सत्ताधारी भाजपाही तामिळनाडूमध्ये आपला पाया मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. काही दिवसांपूर्वीच गृहमंत्री अमित शाहा यांनी चेन्नईचा दौरा केला होता. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी पुढील निवडणुकीत अण्णा द्रमुक आणि भाजपा एकत्र लढणार असल्याची घोषणा केली होती. त्यातच रजनीकांत यांनाही आपल्याकडे ओढण्याचा भाजपाकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र अमित शाहांच्या दौऱ्यादरम्यान दोघांचीही भेट होऊ शकली नव्हती.