राजस्थान, तेलंगणात प्रचाराच्या तोफा थंडावल्या; शुक्रवारी मतदान; मंगळवारी निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 05:30 AM2018-12-06T05:30:12+5:302018-12-06T05:30:20+5:30
राजस्थान व तेलंगणातील प्रचाराच्या तोफा बुधवारी संध्याकाळी थंडावल्या.
नवी दिल्ली : राजस्थान व तेलंगणातील प्रचाराच्या तोफा बुधवारी संध्याकाळी थंडावल्या. या दोन्ही राज्यांमध्ये ७ डिसेंबर रोजी मतदान होईल. त्यानंतर ११ डिसेंबर रोजी या दोन तसेच छत्तीसगड, मध्यप्रदेश व मिझोराम अशा पाच राज्यांच्या विधानसभांचे निकाल लागतील. यापैकी राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगडमध्ये आतापर्यंत भाजपाचे सरकार होते. तेलंगणात के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील तेलंगणा राष्ट्र समितीचे तर मिझोराममध्ये लाल थनहवला यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार होते.
आता मतदार काय कौल देतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यांत प्रामुख्याने भाजपा व काँग्रेस यांच्यामध्ये लढती होणार आहेत. त्यापैकी राजस्थानमध्ये भाजपाची स्थिती चांगली नाही, असे मतदार चाचण्यांचे निष्कर्ष असले तरी तिथे त्या पक्षाने जोरदार प्रचार केला आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय नेते, मंत्री तसेच काही योगी आदित्यनाथ यांनी तिथे
प्रचार केला. राजस्थान कसेही
करून टिकवायचेच, असा भाजपाचा प्रयत्न आहे. दुसरीकडे किमान
एखाद दोन राज्ये आपल्या ताब्यात यावीत, या दृष्टीने काँग्रेसने प्रचार केला.
आम्हाला मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या तिन्ही राज्यांत कसबसे का होईना, बहुमत मिळेल, असे काँग्रेस नेते सांगत आहेत. तेलंगणात टीआरएस आणि काँग्रेसप्रणीत तेलगू देसम, टीजेएस व सीपीआय यांच्या आघाडीतच सामने होतील. तिथे भाजपा नाममात्र असेल, असे चित्र आहे. मिझोराममध्ये काँग्रेस व मिझो नॅशनल फ्रंट अशाच लढती होतील. तिथे भाजपा प्रचारापुरतीच आहे. पण निकालांनंतर पुन्हा काँग्रेसचे सरकार येऊ नये, यासाठी भाजपा सर्व प्रयत्न करेल, अशी चर्चा आहे.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी राजस्थानात सभा घेतल्या, तर राहुल गांधी यांनी तेलंगणाचा दौरा केला. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या भाषणाचा व्हिडीओ तेलंगणाच्या विविध भागांत आज दाखवण्यात आला. राजस्थानात भाजपाने संपूर्ण काळात २२२ मोठ्या प्रचारसभा घेतल्या आणि १५ ठिकाणी रोड शो केले. या दोनच नव्हे, तर पाचही राज्यांत कोणाला यश मिळते, हे ११ डिसेंबर रोजी दुपारपर्यंत स्पष्ट होईल, असे सांगण्यात येत आहे. मतदान शुक्रवारी संध्याकाळी संपल्यानंतर या पाचही राज्यांत मतदारांचा कौल काय होता, हे दाखवण्यासाठी विविध वृत्तवाहिन्यांवर मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष दाखवण्यात येतील. त्यांचेही अंदाजही कितपत खरे ठरतात, हेही ११ डिसेंबरलाच कळेल.