श्रीनगर, दि. 9- गेल्या वर्षभरापासून अशांत असलेल्या जम्मू-काश्मीरच्या अडचणी सोडवण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींशी आपण खुल्या मनाने चर्चा कारायला तयार आहोत, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हंटलं आहे. राजनाथ सिंह चार दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. शनिवारी राजनाथ सिंह श्रीनगरमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतली. आपल्या या दौऱ्यात ते अनंतनाग, जम्मू आणि राजौरीलाही भेट देणार आहेत. तसंच सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीं आणि उद्योग जगतातील व्यक्तींच्या भेटी घेणार आहेत.
'राज्यातील समस्या सोडवण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. समस्या सोडवण्यास इच्छुक व्यक्तींशी चर्चा करण्याची आपली तयारी आहे, असं राजनाथ सिंह यांनी म्हंटलं आहे. काश्मीरसाठी ८० हजार कोटी रुपयांचं पंतप्रधान विशेष पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. त्या अंतर्गत समाविष्ट योजनांच्या प्रगतीचा राजनाथ सिंह आढावा घेणार आहेत. राज्यातील सुरक्षाव्यवस्था सामान्य करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचाही आढावा ते घेणार आहेत. अनंतनागमध्ये दहशतवादविरोधी मोहिमे अंतर्गत तैनात असलेल्या राज्यातील पोलीस कर्मचारी, सीआरपीएफ आणि बीएसएफच्या जवानांचीही भेट घेणार आहेत. तसंच रविवारी सुरक्षाव्यवस्थेशी संबंधित आढावा बैठकीतही सहभागी होतील. या बैठकीला मुफ्ती यांच्यासह काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.
काश्मीरमध्ये सुरू असलेल्या सध्याच्या परिस्थितीवर तरुणांचं मत जाणून घेण्यासाठी राजनाथ सिंह श्रीनगरमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. राजौरीत ते बीएसएफच्या शिबिरालाही भेट देतील. जम्मूमध्ये ते उद्योगपती आणि विविध समुदायांच्या प्रतिनिधींशीही चर्चा करणार असल्याची माहिती मिळते आहे.