राजनाथ सिंह यांना सलामी देण्यास नकार जोधपूरमधील पोलिसांचा नवा पवित्रा; वेतनकपातीच्या चर्चेमुळे २५० कर्मचारी सुट्टीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 01:09 AM2017-10-18T01:09:01+5:302017-10-18T01:09:13+5:30
पोलिसांच्या वेतनात कपात होणार असल्याच्या चर्चांमुळे या संभाव्य निर्णयाला विरोध म्हणून जोधपूरमधील २५० पोलिसांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर एक दिवसांची सुटी घेतली.
जयपूर : पोलिसांच्या वेतनात कपात होणार असल्याच्या चर्चांमुळे या संभाव्य निर्णयाला विरोध म्हणून जोधपूरमधील २५० पोलिसांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर एक दिवसांची सुटी घेतली. म्हणजेच गृहमंत्री राजनाथ सिंह यांना देण्यात येणारी सलामी म्हणजेच ‘गार्ड आॅफ आॅनर’ देण्यास या पोलिसांनी अप्रत्यक्षपणे नकार दर्शविला.
गुप्तचर विभागाच्या एका विभागीय प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनासाठी राजनाथ सिंह येथे आले होते. जोधपूरचे पोलीस आयुक्त अशोक राठौर यांनी सांगितले की, २५० पोलीस कर्मचारी एक दिवसाच्या सुटीवर गेले.
यातील काही पोलीस ‘गार्ड आॅफ आॅनर’च्या टीममध्ये होते. या पोलिसांनी येण्यास नकार दिल्याने अन्य पोलिसांना सोबत घेण्यात आले. सुटी मंजूर नसताना कामावर न येणे हा शिस्तभंगाचा भाग आहे. त्यामुळे या पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकेल.
अतिरिक्त पोलीस महासंचालक एम.एल. लाठार यांनाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला. पोलिसांनी त्यांनाही ‘गार्ड आॅफ आॅनर’देण्यास नकार दिला. राजस्थानचे डीजीपी अजित सिंह यांनी सांगितले की, कोणत्याही कर्मचाºयांचे असे वर्तन सहन केले जाणार नाही. वेतन कपातीच्या या फक्त अफवाच आहेत. (वृत्तसंस्था)
असा प्रस्ताव नाही
कॉन्स्टेबलचे वेतन २४,००० रुपयांवरुन १९,००० रुपये होणार असल्याच्या चर्चा येथे आहेत. राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी या अफवा फेटाळून लावत स्पष्ट केले आहे की, पोलिसांचे वेतन कमी करण्याबाबतचा असा कोणताही आदेश सरकारने जारी केलेला नाही. वेतनाशी संबंधित प्रकरणे कॅबिनेट समितीसमोर आहेत. त्यामुळे याबाबत कोणताही भ्रम असायला नको.