नवी दिल्ली- पी. जे. कुरियन यांच्या पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर राज्यसभेचे उपाध्यक्षपद रिक्त आहे. आता या जागी निवडणूक अटळ असून गुरुवारी त्यासाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान लोकसभेत केंद्र सरकारने तेलगू देसम पक्षाचा अविश्वास ठरावाची विनंती मंजूर करत त्यावर चर्चा घेतल्याने लोकसभेत काही काळ कामकाज सुरु झाले आहे. मात्र आसाममधील एनआरसीचा मुद्दा उपस्थित झाल्यावर दोन्ही सभागृहांतील कामकाज वारंवार स्थगित करावे लागले आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी तृणमूल काँग्रेसच्या घोषणांमुळे दोन्ही सभागृहांच्या कामकाजात अडथळे आले.आज राज्यसभेत केंद्रीय सामाजीक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासाठी विधेयकात पर्यायी दुरुस्त्या सुचवल्या. गुरुवारी हे विधेयक लोकसभेत एकमताने मंजूर झाले होते.गृहमंत्री राजनाथ सिंह भारतीय दंडविधान संहितेतील दुरुस्तीसाठी विधेयक मांडतील.केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन दिल्लीमध्ये आले असताना त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्यांना संरक्षण देण्यात दिल्ली पोलीस कमी पडले असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार राजेश यांनी केला तर भाजपाच्या खासदार हीना गावित यांनी आपल्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचे लोकसभेत सांगितले. हीना गावित यांनी आपल्या वाहनावर चाल करुन आलेल्या जमावाचे फोटोही दाखवले. बिहारमधील मुजफ्फरपूर येथील बलात्काराचे प्रकरण लोकसभेत वारंवार उपस्थित करण्यात आले. काँग्रेसच्या खासदार रंजित रंजन यांनी त्याचा मुद्दा उपस्थित केला.
राज्यसभा उपाध्यक्षपदासाठी गुरुवारी निवडणूक- व्यंकय्या नायडू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2018 1:22 PM