नवी दिल्ली - राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी काँग्रेसकडून बी. के. हरिप्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे गुरुवारी होणारी राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचे उमेदवार हरिवंश विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार बी. के. हरिप्रसाद अशी होणार आहे,. मात्र राज्यसभेतील संख्याबळाच्या खेळामध्ये सध्या भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
राज्यसभा उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र अखेरच्या क्षणी हरिप्रसाद यांना उमेदवार घोषित करण्यात आले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी हरिप्रसाद यांना पक्षाचे उमेदवार घोषित केले आहे. दरम्यान, पक्षाने काही विचार करूनच आपल्याला उमेदवारी दिली आहे, अशी प्रतिक्रिया हरिप्रसाद यांनी आपली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दिली.
दरम्यान, एनडीएचे उमेदवार हरिवंश यांनी राज्यसभा उपसभापतीपदासाठी नामांकन दाखल केले. त्यावेळी एनडीएचे सर्व नेते उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे शिवसेनेचे नेतेही नामांकन भरताना उपस्थित होते. सध्या राज्यसभेतील संख्याबळामध्ये एनडीएच्या हरिवंश यांना आघाडी मिळाल्याचे चित्र आहे. राज्यसभेत एनडीएचे संख्याबळ 116 आहे. तसेच बीजेडीने पाठिंबा दिल्यानंतर ते वाढून 123 पर्यंत जाईल. मात्र एनडीएच्या उमेदवाराला 125 ते 128 मते मिळावीत, यासाठी भाजपाची टीम प्रयत्नशील आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि मित्रपक्षांकडे 118 सदस्यांचे पाठबळ आहे. या निवडणुकीत मित्रपक्षांनी काँग्रेसने आपला उमेदवार उभा करावा असा आग्रह धरल्याने काँग्रेसने पक्षाचे ज्येष्ठ नेते बी.के. हरिप्रसाद यांना उमेदवारी दिली आहे.