उद्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेससाठी फक्त 1 मत ठरणार निर्णायक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2017 05:49 PM2017-08-07T17:49:26+5:302017-08-07T17:57:47+5:30
गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी उद्या निवडणूक होत असून सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.
सूरत, दि. 7 - गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी उद्या निवडणूक होत असून सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अहमद पटेल गुजरातमधून राज्यसभेची निवडणूक लढवत असल्याने सर्वांचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. अहमद पटेल यांचा राज्यभेत जाण्याचा मार्ग रोखून वर्षअखेरीस होणा-या गुजरात विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसच्या मनोधैर्याचे खच्चीकरण करण्याची भाजपाची रणनिती आहे.
गुजरात काँग्रेसमध्ये मोठया प्रमाणावर बंडखोरी झाली आहे त्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत असल्याने सगळयांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकर सिंह वाघेला फुटल्यानंतर काँग्रेसच्या आणखी सहा आमदारांनी बंडखोरी केली. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीपर्यंत आणखी पडझड होऊ नये म्हणून काँग्रेसला उर्वरित 44 आमदारांना बंगळुरुतल्या रिसॉर्टमध्ये ठेवावे लागले. कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आहे.
अहमद पटेल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव आहेत. त्यांना विजयासाठी 45 मतांची आवश्यकता आहे. काँग्रेसकडे सध्या 44 आमदार आहेत. आज सकाळीच हे सर्व आमदार बंगळुरूहून गुजरातमध्ये परतले. त्या सर्वांना आनंद जिल्ह्यातील रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे. 44 आमदारांपैकी कोणी क्रॉस व्होटिंग किंवा नोटाचा पर्याय वापरला नाही तर, काँग्रेसला अहमद पटेल यांच्या विजयासाठी फक्त एका आमदाराच्या पाठिंब्याची गरज भासेल.
तीन जागांसाठी एकूण चार उमेदवार रिंगणात आहेत. शहा आणि इराणी वगळता भाजपाने बलवंतसिंह राजपूत यांना रिंगणात उतरवले आहे. त्यांनी अलीकडेच काँग्रेससोडून भाजपामध्ये प्रवेश केला. पटेल यांच्या विजयासाठी काँग्रेस गुजरात विधानसभेतील राष्ट्रवादीचे दोन आमदार, संयुक्त जनता दल आणि गुजरात परिवर्तन पार्टीच्या प्रत्येकी एका आमदारावर अवलंबून आहे. कुठल्या पक्षाला पाठिंबा देण्यासंबंधी अद्याप निर्णय झालेला नाही असे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी रविवारी सांगितले.
अहमद पटेल उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी आणि जदयूचा आमदार त्यांच्यासोबत होता. काँग्रेसच्या 51 आमदारांपैकी सात आमदार बंगळुरुला गेले नव्हते. हे आमदार वाघेल यांच्या गटातील असून त्यांच्यापैकी एक आमदार मदत करेल असा काँग्रेसला विश्वास आहे. 182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेत काँग्रेसचे 57 आमदार होते. त्यातील सहा आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ 51 झाले.