सोनं तस्करीच्या संशयावरून खासदार पुत्राची विमानतळावर कपडे काढून एक्स-रे तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 06:33 PM2022-11-06T18:33:24+5:302022-11-06T18:35:35+5:30
याप्रकरणी राज्यसभा खासदार अब्दुल वहाब यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून तक्रार केली आहे.
सोन्याची तस्करी करत असल्याच्या संशयावरून मुस्लिम लीगचे राज्यसभा सदस्य अब्दुल वहाब यांच्या मुलाचे कपडे काढून एक्स-रे चाचणी केल्याची घटना केरळविमानतळावर घडली आहे. याप्रकरणी राज्यसभा सदस्य अब्दुल वहाब यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. तक्रारीत दावा केला आहे की, त्यांच्या मुलाला तिरुअनंतपूर विमानतळावर सुमारे एक तास रोखून ठेवण्यात आले आणि नंतर जबरदस्तीने एक्स-रे तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले.
खासदाराने आपल्या पत्रात म्हटले की, माझ्या मुलाला तिरुअनंतपूर विमानतळावर सुमारे एक तास रोखून ठेवण्यात आले. सुरुवातीला मुलाची कसून चौकशी केली आणि नंतर त्याच्या सामानाचीही तपासणी करण्यात आली. यानंतर कपडे काढून त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये एक्स-रे करण्यासाठी नेण्यात आले. त्याने सोने त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लपवले किंवा गिळले असा संशय आल्याने त्याची कपडे काढून तपासणी केली. विमानतळावर आपण खासदाराचा मुलगा असल्याचे सांगितल्यानंतरही अधिकारी त्याची तपासणी करत राहिले, अशी माहिती खासदाराने पत्रात दिली.
मुलगा शहाजहानहून परतला होता
खासदाराने सांगितले की, 1 नोव्हेंबर रोजी त्यांचा मुलगा शारजाहून एअर अरेबियाच्या विमानाने आला होता. एक्स-रे तपासणीनंतर सोने न सापडल्याने त्याला सोडून देण्यात आले. हिंदुस्तान टाईम्सशी फोनवर झालेल्या संभाषणात खासदाराने आपल्या मुलासोबत केलेले कृत्य अमानवी असल्याचे म्हटले आहे. निकषांचे उल्लंघन करणाऱ्या सीमाशुल्क अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना ताब्यात घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अधिकारी काय म्हणाले?
या प्रकरणाबाबत कस्टमच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, गैरसमज झाल्यामुळे हे कृत्य झाले आहे. एअर अरेबियाच्या विमानातून याच नावाचा एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी करत असल्याची गुप्त माहिती विभागाला मिळाली होती. सीमाशुल्क आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून त्यात तफावत आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले.