नारेबाजी : विजय दर्डा यांच्यासह काँग्रेस सदस्यांच्या संतप्त भावना
जयशंकर गुप्त - नवी दिल्ली
हैदराबादच्या विमानतळावरील देशी टर्मिनलचे नाव बदलण्याच्या मुद्यावर राज्यसभेत काँग्रेसच्या सदस्यांनी लागोपाठ दुस:या दिवशी गुरुवारी जोरदार नारेबाजी करीत संतप्त भावना व्यक्त केल्या. दोनदा कामकाज तहकूब झाल्यानंतर दुपारी 2 वाजता भोजन अवकाशासाठी तिस:यांदा कामकाज थांबविण्यात आले. यात प्रश्नोत्तराचा तास वाया गेला. हैदराबाद विमानतळाच्या देशी टर्मिनलला आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. टी. रामाराव यांचे नाव देण्याच्या निर्णयावर फेरविचार करावा अशी मागणी काँग्रेसच्या सदस्यांनी बुधवारी केली होती. त्यावर आंतरराष्ट्रीय टर्मिनलला राजीव गांधी यांचेच नाव असल्याचे कारण देत सरकारने फेरविचार होणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
सभागृहाचे कामकाज सुरू होताच काँग्रेसचे व्ही. हनुमंत राव यांनी हा मुद्दा उपस्थित केला. हैदराबाद विमानतळाच्या काही भागाला एन.टी. रामाराव टर्मिनल असे नाव देण्यात आले असून राजकीय लाभ मिळविला जात आहे, असे ते म्हणाले. त्यानंतर काँग्रेसच्या सदस्यांनी हाती फलक व घोषणा देत सभापतींच्या आसनासमोर धाव घेतली. त्यावर उपसभापती पी. जे. कुरियन म्हणाले की, दिवंगत राजीव गांधी यांच्यावर प्रेम करणारे तुम्ही एकमेव व्यक्ती नाहीत. राजीव गांधी हयात असते तर त्यांनीही असा गदारोळ खपवून घेतला नसता. याआधी काँग्रेसच्याच आनंद शर्मा यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्याला उत्तर दिले आहे. शमसाबाद विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय टर्मिनलला राजीव गांधी यांचे नाव आहे. ते बदलण्यात आले नसून देशी टर्मिनलला एन. टी. रामाराव यांचे नाव होते आणि त्यातही बदल केला जाणार नाही, असे उत्तर जेटलींनी बुधवारी दिले होते.
कुरियन यांनी सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या सदस्यांचे त्यावर समाधान झाले नाही. विजय दर्डा, शांताराम नाईक, रजनी पाटील, राजीव गौडा, आनंद भास्कर रापोलू यांनी सभापतींच्या आसनासमोर जात राजीव गांधी अमर रहे, जब तक सूरज चांद रहेगा, राजीव तेरा नाम रहेगा, असे नारे दिले. या गदारोळात कामकाज तहकूब झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांनी आरटीआयअंतर्गत सुरक्षेचा तपशील मागितल्याचा मुद्दा काँग्रेसचे मधुसूदन मिस्त्री यांनी उपस्थित करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना यश आले नाही.
4अदानी समूहाला ऑस्ट्रेलियातील एका कोळसा प्रकल्पासाठी भारतीय स्टेट बँकेने एक अब्ज डॉलरचे कर्ज दिल्याचा मुद्दा राज्यसभेत तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी उपस्थित केला.
4 अदानींना एवढे मोठे कर्ज देण्यामागे साटेलोटे असलेला भांडवलवाद असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन यांनी शून्य तासाला केला. स्टेट बँकेने सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली असून त्यात एका उद्योग समूहाला सर्वात मोठे एकल कर्ज देण्याचा उल्लेख आहे. जगातील पाच आंतरराष्ट्रीय बँकांनी या उद्योग समूहाला कर्ज देण्यास नकार दिला आहे, असे ते म्हणाले.