नवी दिल्ली - सीबीआयच्या विशेष संचालकपदावरुन राकेश अस्थाना यांची नियुक्ती रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. अस्थाना यांच्या नियुक्तीमध्ये कुठल्याही नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा निर्णय योग्य ठरवला. कॉमन कॉज या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावली.
गुजरात केडरचे आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना यांची सीबीआयच्या विशेष संचालकपदी नियुक्ती बेकायद असल्याचा दावा कॉमन कॉजने केला होता. इन्कम टॅक्स खात्याला छाप्यामध्ये सापडलेल्या डायरीमध्ये राकेश अस्थाना यांचे नाव होते. त्यामुळे त्यांची निवड बेकायदा असल्याचा युक्तीवाद याचिकाकर्त्यांचे वकिल प्रशांत भूषण यांनी केला.
अस्थाना यांना कंपनीकडून बेकायद लाभ मिळाल्याचे डायरीमध्ये म्हटले आहे. सीबीआयने अलीकडेच या कंपनीविरोधात आणि काही अधिका-यांविरोधात आर्थिक अफरातफरी प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. त्यामुळे अस्थाना यांची निवड रद्द करावी असा युक्तीवाद प्रशांत भूषण यांनी केला होता. पण न्यायालयाने सरकारच्या बाजूने निकाल दिला.