नवी दिल्ली - पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीमुळे देशाचं राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराचाही मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राम मंदिराच्या प्रश्नावरुन विश्व हिंदू परिषदेच्या हालचाली पाहता येथील वातावरण बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राम मंदिरप्रश्नी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दिवशी विश्व हिंदू परिषद, संघ परिवाराच्याही सभांचं तेथे आयोजन करण्यात आलं आहे. हिंदुत्ववादी संघटनांच्या या कार्यक्रमांना स्थानिक व्यापारी वर्गाकडून विरोध दर्शवण्यात येणार आहे.
(उद्धव ठाकरेंचा दौरा; अयोध्येत सुरक्षेत वाढ)
अयोध्येत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही काही लाख लोक त्यादिवशी अयोध्येत जमतील, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस, धडक कृती दल आणि दहशतवादविरोधी पथके तिथे आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. संयुक्त व्यापार मंडळानं म्हटलंय की, विहिंपच्या धर्मसभेला विरोध दर्शवणार असून उद्धव ठाकरे यांना काळा झेंडे दाखवले जाणार आहेत.
अयोध्येमध्ये हजारोंच्या संख्येने जमा झालेल्या कारसेवकांनी 6 डिसेंबर 1992 रोजी वादग्रस्त बाबरी मशीद उद्ध्वस्त केली होती. यामुळे बरेच दिवस अयोध्येत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेची पुनरावृत्ती होईल, अशी भीती व्यापाऱ्यांच्या मनात आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येतील व्यापाऱ्यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, राममंदिर प्रश्न विविध राजकीय पक्षांकडून पद्धतशीरपणे तापविण्यात येत असल्याने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा काही हजार शिवसैनिकांसह अयोध्या दौरा आणि त्याच काळात रविवारी होणारी धर्मसंसद यामुळे धडक कृती दल (आरएएफ) व दहशतवादविरोधी पथके अयोध्येत तैनात करून सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे.
तर दुसरीकडे, उत्तर प्रदेशचे गृहसचिव अरविंदकुमार यांनी सांगितले की, अयोध्येत जिल्हा प्रशासनाच्या परवानगीशिवाय कोणताही कार्यक्रम होऊ द्यायचा नाही, असे पोलिसांनी ठरविले आहे. तिथे जमलेले लोक मुस्लिमांवर हल्ला करतील ही भीती अनाठायी आहे.
अयोध्येत महायज्ञाचे आयोजनएक हिंदुत्ववादी संघटनेनं म्हटलं की, अयोध्येमध्ये राम मंदिर निर्माणासाठी 1 ते 6 डिसेंबरपर्यंत महायज्ञाचं आयोजन करण्यात येईल. दिल्लीच्या विश्व वेदांत संस्थाननं म्हटलं की, या यज्ञासाठी देशभरातील संत मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील. संघटनेचे संस्थापक स्वामी आनंद महाराज यांनी सांगितले की,''या मंदिरासोबत भारतीयांच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत. यासाठी आम्ही 1 डिसेंबर ते 6 डिसेंबरपर्यंत अयोध्येत अश्वमेध यज्ञाचे आयोजन करणार आहोत''.