- संजय शर्मानवी दिल्ली : २०२४मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अयोध्येतील राम मंदिर हाच सर्वांत मोठा निवडणूक मुद्दा असेल. विरोधी पक्षांच्या जातनिहाय जनगणना व ओबीसी मतांच्या लढाईतही भाजप हाच सर्वांत योग्य मुद्दा मानत आहे. विद्यमान खासदारांपैकी यावेळी कोणाला तिकीट मिळेल, हे संसदेच्या हिवाळी अधिवेशनातच खासदारांना सांगितले जाणार आहे.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपताच भाजप २०२४ची तयारी सुरू करणार आहे. ४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनातच भाजप खासदारांच्या राज्य व विभागवार बैठका बोलावून त्यांना रोडमॅपची माहिती दिली जाईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषद यांनी तळागाळापर्यंत हा मुद्दा नेण्याचे काम सुरू केले आहे.
निवडणुकीचा रोड मॅप-
अयोध्येतील राम मंदिर एकाच मुद्द्यावर भाजप लोकसभा निवडणूक लढवेल. गरीब कल्याण योजना, महिला आरक्षण, ओबीसीशी संबंधित योजनेसह इतर सर्व मुद्दे असले तरी सर्वांत मोठा मुद्दा मंदिर हाच असेल. या मुद्द्यावर स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह व भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा हे आपल्या जाहीर सभेत राम मंदिराचा उल्लेख करताहेत व जनतेला अयोध्या दर्शन घडवण्याबद्दल सांगताहेत. १ जानेवारी ते २२ जानेवारीपर्यंत संपूर्ण देशात राममय वातावरण तयार केले जाईल. फेब्रुवारीमध्ये सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा होईल.
मध्य प्रदेशच्या निवडणुकीत भाजपला मतदान केले तर रामलल्ला दर्शनासाठी मोफत अयोध्यावारी घडवेन, असे आमिष मतदारांना दिले जात आहे. निवडणूक आयोगाने आचारसंहिता बदलली आहे का? देशभरातील रामभक्तांसाठी मोफत अयोध्यावारी करून द्यावी. - उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख
रामलल्लाचे मोफत दर्शन घडविण्याचे आश्वासन देणाऱ्यांनी केंद्र सरकारमध्ये टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सचे नवे खाते सुरू केले असावे. तुम्ही केलेल्या कामांवर निवडणूक लढवा. राम मंदिर दर्शनाचे आमिष का दाखवता? - राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे
काँग्रेसप्रमाणेच उद्धव ठाकरेंनाही आता रामनामाची ॲलर्जी झाली आहे. काँग्रेसने प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वाचे पुरावे मागितले होते. आता तुम्ही रामनाम आणि रामभक्तांचा तिरस्कार करत आहात. - चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप