अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य मंदिराच्या उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. 22 जानेवारीला होणाऱ्या रामलला प्राण प्रतिष्ठा समारंभासाठी आजपासूनच पूजन विधी सुरू होत आहेत. 18 जानेवारीला रामललांची मूर्ती गर्भगृहात स्थापन करण्यात येईल आणि प्राण प्रतिष्ठा समारंभ 22 जानेवारीला होईल.
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 जानेवारी ते 22 जानेवारीपर्यंतचे सर्व कार्यक्रम ठरलेल्या वेळेतच पार पडतील. तर जाणून घेऊयात आज पासून ते 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा समारंभापर्यंतचा अयोध्येतील संपूर्ण कार्यक्रम...
असा असेल राम मंदिर प्राणप्रतिष्ठेपर्यंतचा संपूर्ण कार्यक्रम - आजपासून राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात होणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्रने नियुक्त केलेले यजमान सर्वप्रथम प्रायश्चित्त समारंभ पार पाडतील. यात यजमानांच्या वतीने शरयू नदीच्या तीरावर दशविध स्नान, विष्णूपूजन आणि गाईचा नैवेद्य करण्यात येईल. दशविधा स्नानात पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही पाचही तत्वे देव मूर्तीमध्ये प्रतिष्ठित केले जातात.
17 जानेवारी -17 जानेवारी अर्थात बुधवारी रामललांची मूर्ती घेऊन मिरवणूक अयोध्येत पोहचेतल. मंगल कलशात शरयू नदीचे पाणी घेऊन भाविक राम जन्मभूमी मंदिरात पोहोचतील.
18 जानेवारी या संपूर्ण कार्यक्रमात 18 जानेवारीचा दिवस हा सर्वात विशेष असेल. या दिवशी गणेश अंबिका पूजा, वरुण पूजा, मातृका पूजा, ब्राह्मण वरण आणि वास्तू पूजा होईल. यानंतर गर्भगृरात रामलला यांची मूर्ती स्थापन केली जाईल.
19 जानेवारी -नवग्रहाची स्थापना आणि हवन केले जाईल.
20 जानेवारी - राम जन्मभूमी मंदिराचे गर्भगृह शरयू नदीच्या पाण्याने पवित्र केले जाईल. यानंतर येथे वास्तू शांती आणि अन्नाधिवास अनुष्ठान आयोजित केला जाईल.
21 जानेवारी -या दिवशी गर्भगृहात स्थापन करण्यात आलेल्या रामलला यांच्या मूर्तीला 125 कलशांनी स्नान घातले जाईल आणि यानंतर त्यांना त्यांना समाधी देण्यात येईल.
22 जानेवारी 22 जानेवारीला दुपारी 12:30 वाजल्यापासून ते 1 वाजेपर्यंत प्राणप्रतिष्ठा समारंभ पार पडेल. यानंतर, रामललाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात येणार आहे. तत्पूर्वी कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेल्या लोकांसह 100 हून अधिक चार्टर्ड विमाने अयोध्येत उतरतील. या उत्सवात 150 देशांतील भाविक सहभागी होणे अपेक्षा आहे. महत्वाचे म्हणजे, 21 जानेवारी आणि 22 जानेवारीला मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. प्राणप्रतिष्ठेनंतर अर्थात 23 जानेवारीला रामललाच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात येईल.
प्राणप्रतिष्ठा समारंभावेळी कोण कोण असणार गर्भगृहात? -श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जानेवारीला अर्थात पौष शुक्ल द्वादशीच्या शूभ अभिजित मूहुर्तावर दुपारी 12:20 वाजल्यापासून प्राण परिष्ठा समारंभ सुरू होईल. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत, राज्यपाल आनंदी बेन पटेल, राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास आणि सर्व ट्रस्टी गर्भगृहात उपस्थित असतील.