देहरादून - प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राम मंदिरासाठीच्या नव्या तारखेची घोषणा केली आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून याबाबत नवा दावा करण्यात आला आहे. जेव्हा काँग्रेस सत्तेवर येईल तेव्हाच राम मंदिर बांधले जाईल, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांनी केला आहे. हरिश रावत म्हणाले, ''भाजपावाले मर्यादांचे उल्लंघन करणारे पापी आहेत. जे मर्यादा नष्ट करतात ते मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचे भक्त होऊ शकत नाहीत. आम्ही मर्यादा स्थापन करणारे लोक आहोत. आम्ही संविधानाचा आदर करणारे लोक आहोत. त्यामुळे काँग्रेस जेव्हा सत्तेत येईल, तेव्हाच राम मंदिर बांधले जाईल.'' दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भय्याजी जोशी यांनी 2025पर्यंत राम मंदिर बांधून होईल, असा दावा केला होता. ''मंदिर बांधले पाहिजे, अशी आमची इच्छा आहे. 2025पर्यंत मंदिराचं बांधकाम पूर्ण झाले पाहिजे, अशी आमची इच्छा आहे. आता सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा, तसेच आज राम मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली तर पाच वर्षांत मंदिर बांधून पूर्ण होईल,'' असे भय्याजी जोशी म्हणाले. 1952 साली सोमनाथ मंदिराचे पुनर्निर्माण केल्यानंतर देशाच्या विकासाला गती मिळाली होती. आता 2015 मध्ये रामजन्मभूमीवर मंदिर बांधल्यानंतर पुन्हा एकदा देशाच्या विकासाला गती मिळणार आहे, असा दावा भय्याजी जोशी यांनी प्रयागराज येथे बोलताना केला होता.
राम मंदिर बनणार, पण काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर, हरिश रावत यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 4:39 PM
जेव्हा काँग्रेस सत्तेवर येईल तेव्हाच राम मंदिर बांधले जाईल, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांनी केला आहे
ठळक मुद्देजेव्हा काँग्रेस सत्तेवर येईल तेव्हाच राम मंदिर बांधले जाईलभाजपावाले मर्यादांचे उल्लंघन करणारे पापी आहेत. जे मर्यादा नष्ट करतात ते मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचे भक्त होऊ शकत नाहीत