हिस्सार (हरियाणा), दि. 29 - हत्याकांडातील आरोपी असलेल्या आणि सतलोक आश्रमाचा प्रमुख स्वयंघोषित संत बाबा रामपालची हिस्सार न्यायालयाने मुक्तता केली आहे. मुक्तता करण्यात आली असली तरी त्याला जेलमध्येच राहावं लागणार आहे. कारण त्याची फक्त दोन खटल्यातून मुक्तता करण्यात आली आहे. रामपालवर सरकारी कार्यात अडथळे आणि आश्रमात महिलांना जबरदस्तीने बंधक केल्याचा आरोप होता. या दोन आरोपांमधून त्याची मुक्तता झाली आहे. मात्र त्याच्यावर देशद्रोह आणि हत्येचा खटला सुरु राहणार आहे. त्यामुळे त्याला कारागृहातच ठेवण्यात येणार आहे. हा सत्याचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया संत रामपालचा वकील एपी सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
हिस्सार न्यायालय 24 ऑगस्ट रोजी निकाल देणार होतं, मात्र डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याच्यावरील सुनावणी असल्याने हा निकाल पुढे ढकलण्यात आला होता. रामपालविरोधात देशद्रोहासह अनेक गुन्हे दाखल असून तो सध्या हिस्सारच्या सेंट्रल जेल-2 मध्ये कैदेत आहे.
हिस्सारमध्ये रामपालच्या सतलोक आश्रमात नरबळी गेल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं रामपालच्या अटकेचा आदेश दिला होता. मात्र रामपालला आश्रमात घुसून अटक करायला समर्थकांनी पहिल्यांदा जोरदार विरोध केला. त्यानंतर पोलीस आणि समर्थकांमध्येही धुमश्चक्री झाली. यामध्ये अनेक निष्पापांचे बळी गेले. अखेर पोलिसांनी बाबा रामपालला नोव्हेंबर 2014 मध्ये अटक केली होती. यावेळी बाबा रामपालच्या समर्थकांनी थेट पोलिसांवरच गोळीबार केला होता.
त्याआधी स्वयंघोषित संत बाबा रामपालला २००६ मधील हत्याप्रकरणात हरियाणा पोलिसांनी अटक केली होती. तब्बल दोन आठवड्यांचे अथक प्रयत्न व हिंसक आंदोलनानंतर पोलिसांना रामपालला अटक करण्यात यश आले होते. मात्र 2008 मध्ये त्याला जामीन मिळाला होता. पोलिसांनी त्यावेळी अटकेसाठी आलेल्या खर्चाचा सखोल तपशील कोर्टासमोर सादर केला होता. यामध्ये रामपालचा ठावठिकाणा शोधणे व त्यांच्या अटकेसाठी हरियाणाने १५ कोटी ४३ लाख, पंजाबने ४ कोटी ३४ लाख, चंदीगड प्रशासनाने ३ कोटी २९ लाख आणि केंद्र सरकारने ३ कोटी ५५ लाख रुपये खर्च केले. या स्वयंघोषित संताच्या अटकेसाठी ऐवढा खर्च झाल्याने संताप व्यक्त होत होता.