नवी दिल्ली : द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांनी प्रयागराजच्या धर्मसंसदेत २१ फेब्रुवारीपासून अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्याची घोषणा केल्यानंतर आता संघ परिवारातील विश्व हिंदू परिषदेने लोकसभा निवडणुका होईपर्यंत राम मंदिर आंदोलन स्थगित ठेवण्याचे जाहीर केले आहे.लोकसभा निवडणुकांनंतर नवे सरकार आल्यावरच राम मंदिराबाबत नव्याने रणनीती ठरवली जाईल, असे विश्व हिंदू परिषदेने म्हटले आहे. त्यामुळे पुढील चार महिने ही संघटना राम मंदिरासाठी कोणतेही आंदोलन करणार नाही.लोकसभा निवडणुकांत भाजपा व मोदी सरकारची अडचण होऊ नये, यासाठीच विश्व हिंदू परिषदेने हा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. आतापर्यंत राम मंदिरासाठी विहिंप व संघ परिवारातील सर्व संघटना अतिशय आक्रमक होत्या. त्यासाठी देशातील सर्व खासदारांच्या भेटी परिषदेच्या नेत्यांनी घेतल्या आणि ठिकठिकाणी सभांचेही आयोजन केले. असे असूनही विश्व हिंदू परिषदेने आपला निर्णय बदलला आहे. राम मंदिर हा निवडणुकीचा नव्हे, तर आमच्या आस्थेचा प्रश्न आहे. त्यामुळेच राम मंदिर हा लोकसभा निवडणुकांत मुद्दा बनू नये, अशी इच्छाही विहिंपने अचानकपणे व्यक्त केली आहे.केंद्र सरकारने अयोध्येतील ६७ एकर जमीन विहिंपप्रणित राम मंदिर न्यासाला देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करून संमतीही मागितली आहे. त्याचा निर्णय व्हायचा आहे. अशा वेळी विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर आंदोलन अचानक मागे घेण्यामागे भाजपा व मोदी सरकार यांना ऐन निवडणुकीत अडचणी येऊ न देणे, हेच कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. एरवी, आतापर्यंत मंदिरासाठी आंदोलने करणाऱ्या संघटनेने अचानक मागे घेण्याचे कारण न समजू शकणारे आहे.शंकराचार्यांवर काँग्रेसचा शिक्काशंकराचार्य स्वामी स्वरूपानंद हे संघ परिवारातील नाहीत. हिंदू परिषदेचे नेते जाहीरपणे नव्हे, पण खासगीत या शंकराचार्यांना काँग्रेसचे स्वामी असल्याची टीका करतात. त्यामुळेच मंदिराचे श्रेय त्यांना मिळू नये, असा विहिंपचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. या शंकराचार्यांचा रामालय ट्रस्ट असून, त्यामार्फत मंदिराचे काम व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे, तर आपल्या राम मंदिर न्यासामार्फंत मंदिर बनवून त्याचा फायदा भाजपाला व्हावा, अशी विश्व हिंदू परिषदेची इच्छा आहे.दोन आठवड्यांपूर्वी शंकराचार्य स्वामी शंकरानंद यांनी धर्मसंसदेमध्ये २१ फेब्रुवारीपासून अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी १0 फेब्रुवारीला अयोध्येकडे मार्च करण्याचेही त्यांनी जाहीर केले होते. तेव्हा उपस्थित सर्व संत-महंतांनी त्या घोषणेचे स्वागत केले होते. मंदिर बांधून होईपर्यंत हिंदू गप्प बसणार नाहीत, असे सर्वांनी त्यावेळी स्पष्टपणे म्हटले होते.
लोकसभा निवडणुकांपर्यंत राम मंदिर आंदोलन गुंडाळले, भाजपाची अडचण टाळण्यासाठी घेतला निर्णय?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 6:07 AM