''हा' ठरेल व्हॉट्सअॅपचा बाप'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2018 05:40 PM2018-06-06T17:40:22+5:302018-06-06T17:40:22+5:30
लवकरच प्ले स्टोरवर येणार नवं अॅप
नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वीच पतंजलीनं किंभो नावाचं मेसेजिंग अॅप सुरू केलं होतं. मात्र अनेक तांत्रिक अडचणी येत असल्यानं हे अॅप प्ले स्टोरवरुन हटवण्यात आलं. याबद्दल पहिल्यांदाच रामदेव बाबांनी भाष्य केलं आहे. किंभो अॅप गुगलनं नव्हे, तर पतंजलीनेच प्ले स्टोरवरुन हटवलं, असं रामदेब बाबांनी म्हटलं. किंभो अॅप कॉपी करुन तयार करण्यात आल्याच्या आणि यात वापरकर्त्यांचा डेटा फारसा सुरक्षित नसल्याच्या तक्रारीही सायबर तज्ज्ञांकडून उपस्थित करण्यात आल्या होत्या.
पतंजलीकडून तयार करण्यात आलेलं चॅटिंग अॅप इतर कोणत्याही मेसेजिंग अॅपपेक्षा कमी नसल्याचा दावा रामदेव बाबांनी केला. ते एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलत होते. पतंजलीचं अॅप सर्वाधिक यूजर फ्रेंडली असून त्यात व्हॉट्सअॅपच्या तुलनेत जास्त फिचर्स असल्याचं रामदेव बाबा म्हणाले. या कार्यक्रमात सूत्रसंचालिकेनं किंभो व्हॉट्सअॅपचा लहान भाऊ असेल का, असा प्रश्न रामदेव यांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना, किंभो व्हॉट्सअॅपचा बाप असेल, असं रामदेव बाबांनी म्हटलं. '25 कोटी लोकांनी या अॅपविषयी सर्च केलं आहे. ही संख्या खूप मोठी आहे,' असं ते म्हणाले.
किंभो अॅप गुगलनं प्ले स्टोरवरुन का हटवलं, असा प्रश्न यावेळी रामदेव बाबांना विचारण्यात आला. गुगलकडून नव्हे, तर पतंजलीकडूनच किंभो अॅप हटवण्यात आलं, असं उत्तर त्यांनी दिलं. 'युवा भारती संघटनेच्या 5-10 हजार लोकांनी किंभो अॅप वापरुन पाहिलं आहे. हे अॅप इतक्या लोकांनी वापरलं की त्याला कोट्यवधी हिट्स मिळाले होते. आता आम्ही पुन्हा एकदा किंभो अॅपची चाचणी घेऊ. हे अॅप व्हॉट्सअॅपचा बाप ठरेल,' असं रामदेव बाबांनी म्हटलं.