नवी दिल्ली: बांगलादेशच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त बांगलादेश सरकारकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बांगलादेशला भेट दिली. बांगलादेशच्या राष्ट्रपतींची भेट घेतली. त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी भारताकडून बांगलादेशला एक स्पेशल गिफ्ट देण्यात आलं.
भारतानं १९७१ मधील मिग-२१ ची प्रतिकृती बांगलादेशला भेट म्हणून दिली. राष्ट्रपती कोविंद यांनी दिलेली भेट त्यांचे समकक्ष असलेल्या अब्दुल हमीद यांनी स्वीकारली. भारतीय हवाई दलाच्या इतिहासात मिग-२१ विमानांना विशेष स्थान आहे. १९७१ च्या लढाईत भारतीय हवाई दलानं अतुलनीय शौर्य गाजवलं. मिग-२१ विमानांच्या मदतीनं भारतीय हवाई दलानं पाकिस्तानी लष्कराला दणका दिला. १९७१ च्या युद्धात हवाई दलानं नेत्रदीपक कामगिरी केली. मिग-२१ विमानांनी पाकिस्तानला अक्षरश: पाणी पाजलं. मिग-२१ चा धडाका इतका जबरदस्त होता की पाकिस्तानी सैनिक रणगाडे, गाड्या सोडून पळाले. पाकिस्तानी हवाई दलानं डोकं वर काढण्याचा प्रयत्न केला. पण मिग-२१ विमानांनी त्यांनाही धूळ चारली. या संपूर्ण युद्धात भारतानं केवळ एक विमान गमावलं, तर पाकिस्तानला १३ विमानं गमवावी लागली.
भारतीय हवाई दलाचे शूर वैमानिक यांनी १९७१ च्या युद्धात पाकिस्तानच्या अक्षरश: नाकीनऊ आणले. मिग-२१ विमानांनी पाकिस्तानी हवाई दलाची ७ एफ-१०४ ए स्टारफायटर्स, २ एफ-८६ सेबर, २ एफ-६ (मिग-१९), १ मिराज III ईपी आणि १ सी-१३० हर्क्युलिस विमानं जमीनदोस्त केली. याशिवाय याच विमानांच्या मदतीनं पाकिस्तानी हवाई दलाची एअरफील्ड्स,, रडार स्टेशन्स आणि सैनिकी तळ उद्ध्वस्त करण्यात आली. ढाक्यातील गव्हर्नरचं निवासस्थानदेखील मिग-२१ विमानांनी उडवलं.