Corona Update In India: देशात सध्या सणासुदीचं वातावरण आहे. नवरात्रीनंतर आता दिवाळी आणि छठ पुजेची जोरदार तयारी सुरू आहे. यातच कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील काही ठिकाणी कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं दिसून आल्यानं प्रशासन खडबडून जागं झालं आहे. रुग्णसंख्येतील वाढीमुळे रेल्वे स्थानकांवरही चाचण्याची संख्या वाढविण्यात आली आहे. यातच झारखंडमधील हटिया रेल्वे स्थानकावर धक्कादायक माहिती समोर आली आहे. शनिवारी हटिया रेल्वे स्थानकावरुन एकाच वेळी ५५ प्रवाशांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पॉझिटिव्ह आढळून आलेले सर्व प्रवासी तपस्विनी एक्स्प्रेस आणि राऊरकेला एक्स्प्रेसनं हटिया रेल्वे स्थानकावर उतरले होते. या सर्वांची रेल्वे स्थानकावर रॅपिड अँटिजन चाचणी करण्यात आली होती. ५५ प्रवाशांची रॅपिड अँटिजन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे सर्व प्रवासी अँटिजन चाचणीसाठी आपला नमुना देऊन आपापल्या घरी निघून गेले होते. कोणताही व्यक्ती जर पॉझिटिव्ह आढळून आला तर त्याला आयसोलेशन सेंटर किंवा कोविड सेंटरमध्ये पाठविण्यात यावं असं आरोग्य विभागानं बजावून सांगितलेलं आहे. असं असतानाही हटिया रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे नमुने घेण्यात आल्यानंतर त्यांना घरी जाऊ दिलं जात होतं. यामुळे आता कोरोना विस्फोटाची शक्यता बळावली आहे.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर परराज्यातील कामगार, कर्मचारी, मजूर आपापल्या घरी परतत असतात यामुळे रेल्वे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. सध्याचा काळ कोरोना प्रादुर्भावाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा मानता जात असून सरकारनं यासंदर्भात काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. प्रत्येक प्रवाशाची कोरोना चाचणी करणं बंधनकारक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.