आईला प्रसिद्धी मिळताच मुलगी तब्बल 10 वर्षाने परतल्याने 'रानू'दीं म्हणते...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 03:54 PM2019-08-26T15:54:11+5:302019-08-26T18:16:41+5:30
रानू मंडल प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांची मुलगी तब्बल 10 वर्षानंतर त्यांचा शोध घेत आली असल्याचे समोर आले आहे.
नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या कोलकाता रेल्वे जंक्शन मार्गावरील रानाघाट रेल्वे स्थानकावर गाणे गात उदरनिर्वाह करणा-या रानू मंडालचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि तिच्या नशिबाने कलाटणी घेतली. रानू मंडल प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांची मुलगी तब्बल 10 वर्षानंतर त्यांचा शोध घेत आली असल्याचे समोर आले आहे.
रानू मंडल त्यांच्या मुलीपासून तब्बल 10 वर्ष दूर राहिल्या होत्या. पण त्यांची बॉलिवूडमध्ये एन्ट्री होताच त्यांची मुलगी त्यांच्याकडे धावत आली आहे. त्यांची मुलगी परत आल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला असून माझ्या दूसऱ्या आयुष्याला सुरुवात झाल्याचे रानूने सांगितले.
बाबू मंडल यांच्याशी रानू यांचा विवाह झाला होता. मात्र, पतीच्या निधनानंतर त्या रेल्वे स्थानकावर गाणं गाऊन लोकांचा मनोरंजन करत आपली भूक भागवत होत्या. काही दिवसांपूर्वी ‘रानू दी’ रेल्वे स्टेशनवर गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजातील ‘एक प्यार का नगमा है.. ’ हे गाणं गात असताना एका व्यक्तिने गातानाचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर शेअर केला होता. हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की, रानू एका रात्रीत स्टार होऊन थेट तिने बॉलिवूडसाठी पहिले गाणे रेकॉर्ड केले.
रानू हिमेशच्या 'हॅपी हार्डी और हिर' या बॉलिवूड चित्रपटात 'तेरी मेरी कहानी' हे गाणं गाताना दिसणार आहेत. तसेच खुद्द हिमेशने सुद्धा 'तेरी मेरी कहानी' गाण्याला आवाज दिला आहे. रानू आणि हिमेशचा व्हिडिओ सध्या वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.