नवी दिल्ली- चोरी व बलात्काराच्या आरोपात एका स्पायडरमॅनला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. इमारतीच्या भिंतींवरून चढून घरफोडी केल्याप्रकरणी तसंच एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी या स्पायडरमॅनला अटक झाली आहे. चोरी करण्यासाठी ही व्यक्ती इमारतीच्या भिंतींवरून चढून घरात घुसायची. जय प्रकाश असं या व्यक्तीचं नाव असून त्याने पोलीस चौकशीत ही सर्व माहिती दिली आहे. मे महिन्यामध्ये जय प्रकाश एका व्यावसायिकाच्या घरात चोरीच्या उद्देशाने घुसला होता. त्या व्यवसायिकाची पत्नी घरात एकटी असताना तिच्याशी अश्लिल वर्तन केल्याचं जय प्रकाश या आरोपीने पोलिसांना सांगितलं आहे.
पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीत फक्त चोरी झाल्याचं नमूद करण्यात आलं असून बलात्कार झाल्याची तक्रार नव्हती. आरोपी जय प्रकाशची चौकशी करताना पोलिसांसमोर बलात्काराची बाब उघड झाल्यावर पोलिसांनी पीडित महिलेच्या घरी जाऊन त्यांना जबाब द्यायला सांगितलं. स्वतःवर कलंक लागू नये, या भीतीमुळे बलात्कार झाल्याचं सांगितलं नाही, असं पीडित महिलेने त्यांच्या जबाबात म्हंटलं आहे.
आरोपी जय प्रकाश इमारतीतील घरांच्या खिडक्यांवरून चढून घरात घुसायचा तसंच स्क्रुड्रायव्हरने लॉक तोडून घरात घुसायचा. जय प्रकाश जेव्हा त्या व्यावसायिकाच्या घरात चोरीसाठी घुसला होता. तेव्हा घरात कुणी नाही असं त्याला वाटलं. पण बेडरूममध्ये व्यावसायिकाची पत्नी झोपली होती. तिने आरडाओरडा करू नये, म्हणून जय प्रकाशने त्यांचं तोंड बांधून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर जय प्रकाशने घरात चोरी करून तिथून पळ काढला तसंच झालेल्या प्रकार कोणालाही न सांगण्याची पीडित महिलेला धमकी दिली. जय प्रकाशने पोलीस चौकशीत ही सर्व माहिती दिली आहे.
पीडित महिलेने नंतर शेजाऱ्यांना घरात चोरी झाल्याचं सांगितलं. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायला गेल्यावर त्यांनी फक्त घरफोडी झाल्याचं सांगितलं होत. तेव्हा बलात्काराची तक्रार दिली नव्हती. पण पोलीस चौकशीनंतर इतर गोष्टी उघड झाल्या. जय प्रकाशने याआधीही अनेक घरफोड्या केल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं आहे.