आप आमदारावर बलात्काराचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 10:04 AM2019-03-07T10:04:45+5:302019-03-07T10:16:10+5:30
पिडीत महिलेने केलेल्या आरोपांनुसार आपचे रिठालाचे आमदार महेंद्र गोयल यांनी दोन वर्षांपूर्वी बलात्कार केला होता.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आम आदमी पार्टी तयारी करण्यात गुंतली असताना दिल्लीचे आमदारासह त्यांच्या भावावर एका महिलेने बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पिडीतेने प्रशांत विहार पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नसली तरीही आपवर टीकेची झोड उठली आहे.
पिडीत महिलेने केलेल्या आरोपांनुसार आपचे रिठालाचे आमदार महेंद्र गोयल यांनी दोन वर्षांपूर्वी बलात्कार केला होता. बुधवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार महेंद्र गोयल आपल्याला ओळखत असल्याचे तिने म्हटले आहे. यावर भाजपाचे महासचिव कुलजीत चहल यांनी ट्विट करून गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली होती.
गोयल यांनी या महिलेवर बलात्कार केल्यानंतर तिला धमक्या दिल्या आहेत. तिची आक्षेपार्ह चित्रफित व्हायरल करण्याची धमकीही दिली होती. रोहिणी क्षेत्रामध्ये राहणारी ही महिला आमदाराकडे मदत मागण्यासाठी गेली होती. 10 वर्षांपूर्वी तिच्या पतीचा मृत्यू झाला होता. आर्थिक अडचम भासल्याने दोन वर्षांपूर्वी ही महिला विधवा पेन्शन योजनेसाठी आमदाराच्या घरी गेली होती. यावेळी आमदाराने तिच्याशी जबरदस्तीने शारिरिक संबंध ठेवले. यानंतर कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही दिली होती. तसेच तिचा मोबाईलही काढून घेतल्याचा आरोप महिलेने केला आहे.
Delhi: Case registered against AAP MLA from Rithala, Mohinder Goyal at Prashant Vihar police station after a woman lodged complaint against him accusing him of raping her. The Crime Against Women Cell is investigating the case
— ANI (@ANI) March 6, 2019
दोन वर्षानंतर गेल्या महिन्यात 5 फेब्रुवारीला महेंद्र गोयल यांचा भाऊ ईश्वर याने तिला अश्लिल व्हिडीओ पाठविले आणि संदेशही पाठविले. तसेच त्याच्यासोबत शारिरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले.
या प्रकरणी गोयल यांनी महिलेवर ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप केला. ही महिला लोकांकडून पैसे घेते आणि परत करत नाही. याबाबत तिच्यावर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी सांगितले की, तपास सुरु असून यानंतरच कारवाई केली जाईल. आमदाराविरोधात भादंवि 376, 506 आणि 509 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑगस्ट 2016 मध्येही आपचे माजी मंत्री आणि आमदार संदीप कुमार सीडी स्कँडलमध्ये अडकले आहेत. या सीडी स्कँडलमध्ये कुमार महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळले होते. यानंतर केजरीवाल यांनी त्यांना मंत्रीपदावरून हटविले होते.