बिहारचे बालिकागृह बनले बलात्कारगृह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:45 AM2018-07-24T00:45:11+5:302018-07-24T00:45:35+5:30
माणुसकीला काळिमा : २४ मुलींवर अत्याचार, एका मुलीचा मृतदेह शोधण्यास खोदकाम
पाटणा : मुजफ्फरपूर येथील बालिकागृह चक्क बलात्कारगृह बनल्याचा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार आता समोर आला आहे. गेल्या महिन्यात एका मुलीच्या हत्येच्या प्रकरणानंतर उघडकीस आलेल्या प्रकरणानंतर नवनव्या धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत.
बालिकागृह परिसरात एका मुलीचा मृतदेह काढण्यासाठी तेथे खोदकाम सुरूआले. पण हाती काही लागले नाही. या बालिकागृहात मागील काही दिवसांत २४ मुलींवर बलात्कार झाल्याची बाब समोर आली. या मुलींनी सांगितले होते की, सोबत राहणाऱ्या एका मुलीला येथील कर्मचाºयांनी एवढी मारहाण केली की, तिचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह परिसरात पुरला. या प्रकरणी दररोज नवीन खुलासे होत आहेत. येथील सहाहून अधिक मुली बेपत्ता झाल्याचेही बोलले जात आहे. मुंबईची संस्था टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सच्या टीमने हे प्रकरण समोर आणले आहे.
समाजकल्याण विभागाने गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणी सेवा संकल्प आणि विकास समितीचे संचालक ब्रजेश ठाकूर आणि आठ महिलांसह १० आरोपी तुरुंगात आहेत. जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष दिलीप वर्मा फरार आहेत.
मुलींना रात्री दिले जायचे ड्रग्ज
लैंगिक अत्याचाराच्या शिकार झालेल्या ३० मुलींना शारिरीक संबंध ठेवण्यापूर्वी प्रत्येक दिवशी ड्रग्जचे डोस दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या मुली मानसिकदृष्ट्या आजारी पडल्या आहेत.
यातील काही मुलींनी आत्महत्या आणि स्वत: ला शारिरीक नुकसान करुन घेण्याचाही प्रयत्न केला. पाटण्यातील नालंदा मेडिकल कॉलेज हॉस्पिटल व कोईलवर स्थित हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी बलात्कार पीडित मुलींवर उपचार करण्याचा
प्रयत्न केला.
या मुलींच्या शरीरावर इंजेक्शनच्या खुणा आढळल्या आहेत. मुलींचा स्वभाव रागीट झाला आहे. त्या कधी ग्रीलला डोके आपटतात. तर, कधी आजूबाजूच्या वस्तू तोडण्याचा प्रयत्न करतात.
आता यूनिसेफच्या मदतीने हैदराबाद स्थित एनफोल्ड इंडिया आणि एम्सच्या डॉक्टरांची एक टीम सोमवारी पाटण्यात पोहचली आहे.