राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) शनिवारी बांगलादेशच्या अंतरिम सरकारला हिंदूंवरील अत्याचार थांबवावेत आणि हिंदू अध्यात्मिक नेते चिन्मय कृष्ण दास यांची तुरुंगातून तत्काळ सुटका करावी, असे आवाहन केले आहे. या शिवाय, आरएसएसचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी एका निवेदनात भारत सरकारने बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्यकांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावेत आणि त्यांच्या समर्थनार्थ जागतिक जनमत तयार करण्यासाठी 'लवकरात लवकर' आवश्यक ती पावले उचलावीत, असे आवाहनही केले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचा निषेध करतो... -होसबळे म्हणाले, "बांगलादेशातील हिंदू, महिला आणि इतर सर्व अल्पसंख्याकांवर इस्लामिक कट्टरपंथीयांकडून होणारे हल्ले, त्यांच्या हत्या, लूटमार, जाळपोळ आणि अमानुष अत्याचाराच्या घटना अत्यंत चिंतेचा विशय आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचा निषेध करतो. विद्यमान बांगलादेश सरकार आणि इतर एजन्सिज त्यांना रोखण्याऐवजी केवळ मूकदर्शक बनले आहे.
जागतिक शांतता आणि बंधुत्वासाठी हे आवश्यक -बांगलादेश पोलिसांनी सोमवारी चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांना ढाक्यातील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली. ते चितगावला जात होते. होसाबळे म्हणाले, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बांगलादेश सरकारला आवाहन करतो की, बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार त्वरित थांबवण्यात यावेत आणि श्री चिन्मय कृष्ण दास यांची तुरुंगातून सुटका करण्यात यावी. या कठीण काळा भारतीय आणि जागतिक समाजाने आणि संस्थांनी बांगलादेशातील पीडितांच्या पाठीशी उभे राहून आपले समर्थन द्यायला हवे. जागतिक शांतता आणि बंधुत्वासाठी हे आवश्यक आहे," असेही ते म्हणाले.