अहमदाबाद - आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज गोलंदाज रविंद्र जडेजाच्या पत्नीने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. रिवाबा जडेजा यांनी भाजपामध्ये अधिकृतपणे प्रवेश केला. गुजरातचे कृषीमंत्री आरसी फालडू आणि खासदार पूनम मदाम यांच्या उपस्थितीत जामनगर येथे भाजपाचे कमळ हाती घेतले. रिवाबा यांच्या पक्षप्रवेशाचा भाजपाला फायदा होईल, असे भाजपा नेत्यांकडून बोलले जात आहे. यापूर्वी रिवाबा यांनी राजपूत संघटनेच्या करणी सेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपा जॉईन केल्यानंतर रवाबा यांनी करणी सेनेला 'जय श्रीकृष्ण' केल्याचे समजते.
भारतीय संघाचा दिग्गज गोलंदाज सर रविंद्र जडेजाच्या पत्नीने भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. आपल्या पक्षासाठी उमेदवार म्हणून नव-नवीन चेहरे शोधण्यात येत आहेत. त्यातच, रविवारी रिवाबा जडेजा यांनी अधिकृतपणे भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपा नेत्यांचाही उत्साह वाढला आहे. तर रिवाबा यांच्या प्रवेशामुळे तरुणवर्ग भाजपाकडे आकर्षित होईल, असेही काही नेत्यांनी म्हटले आहे. रिवाबा यांच्या भाजपा प्रवेशामुळे त्यांना आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाकडून तिकीट दिले जाईल, अशीही चर्चा रंगली आहे. दरम्यान, यापूर्वीच रविंद्र जडेजा आणि रवाबा जडेजा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यावेळी, मोदींनी जडेजाचे कौतुक करत, दोघांसोबतजी भेट आनंददायी होती, असे म्हटले होते. तर जडेजानेही मोदींसोबतची भेट ही आपल्या जीवनातील अभिमानास्पद क्षण असल्याचं म्हटलं होतं.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्येही मायावती यांच्या बहुजन समाजवादी पक्षाच्या आणि अखिलेश यांच्या समजावादी पक्षाच्या काही नेत्यानी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपकडून उमेदवारांना आकर्षित करण्यात येत असून फिर एक बार मोदी सरकार या घोषणेने मिशन लोकसभा 2019 च्या लढाईला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.