नवी दिल्ली - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उर्जित पटेल यांच्या तडकाफडकी राजीनाम्याने देशातील बँकींग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उर्जित पटेल मोदी सरकारच्या दडपणाखाली काम करत असल्याची चर्चा होती. त्यानंतर, आज त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बँकेतील सूत्रानुसार, पटेल आज ऑफिसला आले तेव्हापासूनच शांत होते, दुपार नंतर राजीनामा देत ते निघून गेले.
उर्जित पटेल यांची 2016 साली आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी, मोदींचे समर्थक म्हणून त्यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. मात्र, सप्टेंबर 2019 पर्यंत कार्यकाळ असतानाही उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला. विशेष म्हणजे, मंगळवारी देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल हाती येत आहे. त्यामध्ये भाजप सरकारच्या विरोधात एक्झिट पोलचे सर्वेक्षण आहे. त्यामुळे उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याकडे राजकीय दृष्टीकोनातूनही पाहिले जात असून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तर, मोदी सरकारसोबतच्या वादामुळेच अखेर त्यांनी राजीनामा दिल्याच्या प्रतिक्रिया विरोधकांकडून येत आहेत. दरम्यान, यापूर्वी भारतीय रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी या पदासाठी मुदतवाढ स्वीकारण्यास नकार दर्शवला होता. राजन यांच्या निर्णयानंतरही देशभरात खळबळ उडाली होती. तर, उद्योगजगताने राजन यांच्या निर्णयामुळे देशाचे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया त्यावेळी नोंदवली होती.