नवी दिल्ली - परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांच्या गुगलीवरील टीकेचा खरपूस समाचार घेतला. कुरेशी यांच्या टीकेमुळे त्यांचा खरा चेहरा जगासमोर आल्याचे सुषमा यांनी म्हटले. तसेच, पाकिस्तानच्या मनात शीख बांधवांप्रती कुठलीही प्रेमभावना नसल्याचेही उघड झाल्याचे स्वराज यांनी म्हटले.
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री महमूद कुरेशी यांनी करतारपूर कॉरिडोर भूमिपूजन समारंभासाठी भारत सरकारला निमंत्रीत करणे ही पंतप्रधान इम्रान खान यांनी टाकलेली गुगली होती. या गुगलीमुळे मोदी सरकार क्लीनबोल्ड झाल्याचे कुरेशी यांनी म्हटले होते. कारण, सुषमा स्वराज यांनी व्यस्त असल्याने या कार्यक्रमाला हजेरी लावली नव्हती. त्यामुळे भारताला देण्यात आलेले निमंत्रण ही गुगली होती, असे कुरेशी यांनी म्हटले. कुरेश यांच्या गुगलीवरी टीकेमुळे त्यांचा खरा चेहरा जगासमोर आल्याचे सुषमा यांनी म्हटले. तसेच, पाकिस्तानच्या मनात शीख बांधवांप्रती कुठलीही प्रेमभावना नसल्याचे स्पष्ट झाल्याचेही स्वराज यांनी सांगितले. तसेच भारत सरकारने आपल्या दोन शीख मंत्र्यांना करतारपूर येथील पवित्र गुरुद्वाराच्या दर्शनासाठी पाठवले होते. त्यामुळे तुमच्या गुगली आम्ही अजिबात फसलो नाही, असेही स्वराज यांनी म्हटले आहे. दरम्यान, कुरेशी यांच्या या वक्तव्याच्या एक दिवस अगोदरच सुषमा स्वराज यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.