बंगळुरु: कर्नाटकातील राजकीय नाट्य आता अखेरच्या टप्प्यात आलं आहे. मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळातील काँग्रेस, जेडीएसच्या सर्व सदस्यांनी राजीनामा दिल्यानं कर्नाटकमधील नाट्यावर पडदा पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र बंडखोर आमदार अद्यापही अडून बसले आहेत. आमदारकीचा राजीनामा देणारे बंडखोर नेते आज गोव्याला जाणार होते. मात्र त्यांनी अचानक ही योजना रद्द केली आणि मुंबईत थांबण्याचा निर्णय घेतला. सध्या मुंबईतील अज्ञातस्थळी सर्व बंडखोर आमदार वास्तव्यास आहेत. त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा कर्नाटकातील राजकीय नाट्याच्या केंद्रस्थानी आली आहे. काँग्रेस, जेडीएसच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिल्यानंतरही बंडखोर आमदारांनी तलवार मान्य केलेली नाही. त्यामुळे भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शनिवारपासून कर्नाटकमध्ये राजकीय नाट्य जोरात आहे. काँग्रेस, जेडीएसच्या १३ आमदारांनी राजीनामा दिल्यानं सत्ता नाटक सुरू झालं. कर्नाटकात कोणाचं सरकार येणार, हे ठरवू शकणारे हे आमदार सध्या मुंबईत आहेत. ते आज गोव्याला जाणार होते. मात्र ऐनवेळी त्यांनी ही योजना रद्द करत मुंबईत अज्ञातस्थळी राहण्याचा निर्णय घेतला.बंडखोर आमदारांना मंत्रिपदांची ऑफर देण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांनी केला. मात्र तो निष्फळ ठरला. सोमवारी सकाळी हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत बंडखोर आमदारांना मंत्रिपदांची ऑफर देण्यात आली. मात्र सध्याचं काँग्रेस सरकार अस्थिर असल्याचं म्हणत या आमदारांनी मंत्रिपदं स्वीकारण्यास नकार दिला. बंडखोर आमदार भाजपा सरकारमध्ये सामील होण्यास उत्सुक असल्याचं सांगितलं जात आहे. या आमदारांचं वास्तव्य असलेल्या वांद्र्यातील सोफिटेल हॉटेलवर भाजपाकडून नजर ठेवली जात असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात होती.
बंडखोर आमदारांकडून गोव्याचा प्लॅन रद्द; मुंबई पुन्हा एकदा कर्नाटक नाट्याच्या केंद्रस्थानी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2019 11:06 AM