बंगळुरु : सत्ताधारी आघाडीतील १५ बंडखोर आमदार राजीनाम्यांवर ठाम राहिल्याने कर्नाटकमधील राजकीय नाट्याचा तिढा रविवारीही कायम राहिला. ‘परत आलात तर तुमच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील’, असे गाजर दाखवून काँग्रेसने बंडखोरांना परत आणण्याचा खूप आटापिटा केला, पण सोडून गेलेला एकही आमदार राजीनामा मागे घेण्यास राजी झाला नाही. उलट शनिवारच्या १५ तासांच्या वाटाघाटीनंतर जे स्वत: राजीनामा मागे घेऊन इतरांनाही सोबत घेऊन परत येतील, अशी काँग्रेसला खात्र होती ते एम. टी. नागराजही मुंबईला निघून गेले.काँग्रसचे वजनदार संकटमोचक डी. के. शिवकुमार यांनी बंडखोर आमदारांना राजीनामे मागे घेण्यासाठी त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे गाजर दाखवितानाच विश्वासदर्शक ठरावावरील मतदानात सहभागी न झाल्यास अपात्रतेच्या कारवाईची धमकीही दिली. राजीनामा दिलेले परंतु मुंबईस न गेलेले काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार रामलिंग रेड्डी यांनीही ‘राजीनाम्याविषयी काहीच बोलणार नाही’, असे सांगितले. काँग्रेसच्या आशावादावर विरजण टाकले. त्यांच्या मुलीनेही आमदारकीचा राजीनामा दिला असून तिचा निर्णय ती घेईल, असे रेड्डी म्हणाले.कुमारस्वामी सरकारवरील विश्वासदर्शक ठराव फेटाळला जाण्यासाठी राजीनामे दिलेल्या आमदारांनी त्यावेळी सभागृहात न फरकणेही पुरेसे ठरेल. सर्वोच्च न्यायालयाने मनाई केल्याने आपल्या राजीनाम्यांवर निदान मंगळवारपर्यंत तरी निर्णय होणार नाही या खात्रीने त्यांच्या मुंबईतच राहण्याच्या मनसुब्याला बळ मिळाले आहे.>‘राजीनामा द्या, अन्यथा विश्वासदर्शक ठराव मांडा’मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी बहुमत गमावले असल्याने त्यांनी एकतर लगेच सन्मानाने राजीनामा द्यावा अन्यथा दिलेल्या शब्दाप्रमाणे सोमवारीच विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडावा, असा आग्रह भाजपचे विरोधीपक्षनेते बी. एस. येदियुरप्पा यांनी लावून धरला. त्यासोबतच मुंबईत तळ ठोकलेल्या बंडखोर आमदारांनी किमान बुधवारपर्यंत तरी बंगळुरात न परतण्याचे ठाम संकेत दिल्याने विश्वासदर्शक ठराव मांडला तरी तो जिंकायचा कसा, ही मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची डोकेदुखी कायम आहे.
कर्नाटकातील बंडखोर आमदार राजीनाम्यांवर ठाम; पेच कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 4:58 AM