पंतप्रधान मोदींच्या 'या' ट्विटचा रेकॉर्ड; रतन टाटांचंही ट्विट सर्वाधिक रिट्विट
By मोरेश्वर येरम | Published: December 8, 2020 07:37 PM2020-12-08T19:37:36+5:302020-12-08T19:43:31+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना संबोधित करताना ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी सर्वांना घरातील दिवे बंद करुन दीप प्रज्वलन किंवा मोबाइल फ्लॅश, टॉर्च पेटवण्याचं आवाहन केलं होतं.
नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड-१९ काळात देशाच्या जनतेच्या चांगल्या आरोग्यासाठी दीप प्रज्वलन करण्याचं आवाहन केलेलं ट्विट राजकीय क्षेत्रातील सर्वाधिक रिट्विट केलं गेलेलं ट्विट ठरलं आहे. ट्विटरने मंगळवारी याबाबतची घोषणा केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना संबोधित करताना ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी सर्वांना घरातील दिवे बंद करुन दीप प्रज्वलन किंवा मोबाइल फ्लॅश, टॉर्च पेटवण्याचं आवाहन केलं होतं.
दुसरीकडे, आर्थिक क्षेत्राच्या वर्गवारीत टाटा उद्योगसमूहाचे रतन टाटा यांचे ट्विट सर्वाधिक रिट्विट केले गेले आहे. रतन टाटा यांनी कोरोना रुग्णांना मदत म्हणून टाटा समूहाकडून ५०० कोटींची मदत करत असल्याचं ट्विट केलं होतं.
२०२० या वर्षात ट्विटवर सर्वाधिक संभाषण
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात या वर्षात ट्विटवर सर्वाधिक संभाषण झाल्याची माहिती ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनिष महेश्वरी यांनी दिली आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यापासून ते रुग्णांना केली जाणारी मदत, स्थलांतरित मजुरांना केली गेलेली मदत, प्रेरणादायी कहाण्या या संबंधिचे ट्विट्स या वर्षात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरले आहेत.
कोरोनासह सुशांतसिंह आणि हाथरस प्रकरणही गाजलं
कोरोनानंतर ट्विटवर सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्यांमध्ये सुशांतसिंह राजपूत आत्महत्या आणि हाथरसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचाही समावेश आहे. सुशांतसिंह राजपूत याला श्रद्धांजली अर्पण करणारे ट्विट मोठ्या प्रमाणात या वर्षात केले गेले आहेत. तर हाथरस प्रकरणावर ट्विटवर जोरदार चर्चा झाली आहे.