Nisarga Cyclone: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा महाराष्ट्र, गुजरातला धोका; राज्यात जोरदार पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 12:21 AM2020-06-02T00:21:35+5:302020-06-02T11:36:04+5:30
चक्रीवादळामुळे महाराष्ट्र, गुजरातच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यात 'रेड अलर्ट'
पुणे : मॉन्सून केरळमध्ये दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले असतानाच अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरात राज्यामध्ये धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी ३ व ४ जून रोजी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेले हे चक्रीवादळ ताशी १३ किमी वेगाने किनारपट्टीकडे सरकत आहे़ सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता ते पणजीपासून ३४०किमी, मुंबईपासून ६३० किमी आणि सुरतपासून ८५० किमी दूर समुद्रात होते.मंगळवारी सकाळी त्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. त्यानंतर रात्री त्याचे रुपांतर तीव्र चक्रीवादळात होणार आहे.
मंगळवारी सकाळी चक्रीवादळाची तीव्रता वाढून ते उत्तरेच्या दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्यानंतर ३ जून रोजी दुपारी रायगड जिल्ह्यातील हरीहरेश्वर आणि दमण दरम्यान किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्र, गुजरातच्या किनारपट्टींच्या जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई,रायगड, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्याबरोबरच उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात ३ व ४ जून रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात समुद्र खवळलेला राहणार असल्याने व ताशी ४५ ते ५५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.या राज्यात गेल्या २४ तासात यवतमाळ २३, श्रीरामपूर ७१, वैजापूर ६७,गंगापूर ५१, पुणे लोहगाव ४१, औरंगाबाद १९ मिमी पावसाची नोंद झाली होती.
.........
केरळमध्ये मॉन्सून दाखल
गेली काही दिवस प्रतिक्षा असलेला मॉन्सून अखेर केरळमध्ये दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. गेल्या २ दिवसांपासून केरळमधील १४ निरीक्षण केंद्रापैकी ७० टक्क्यांहून अधिक ठिकाणी पाऊस पडला आहे. त्याबरोबरवार्याची दिशा आणि त्याचा वेग लक्षात घेता हे मॉन्सूनचे वारे असल्याचेहवामान विभागाने जाहीर केले. मॉन्सूनची सोमवारी वाटचाल दक्षिण अरबी समुद्र आणि लक्ष्यद्वीप, मालदीवचा उर्वरित भाग, केरळचा बहुतांश भाग,तामिळनाडुचा काही भाग, कोमोरीनचा व नैऋत्यु बंगालच्या उपसागराचा आणखीकाही भागात झाली आहे.
इशारा : राज्यात २ ते ४ जून दरम्यान कोकण, गोव्याच्या काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
......
३ व ४ जून रोजी पालघर येथे अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे, मुंबई, रायगड, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक येथे ३ जून रोजी तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़ तसेच ४ जून रोजीही जोरदार पावसाचीशक्यता आहे.