नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेस(पीएनबी) १४ हजार कोटी रुपयांना चुना लावून देशातून पळून गेलेल्या हिरे व्यापारी नीरव मोदीला पकडण्यासाठी ‘इंटरपोल’ने ‘रेड कॉर्नर नोटीस’ जारी केली आहे.‘पीएनबी’ घोटाळ््याच्या संदर्भात ‘सीबीआय’ व ‘ईडी’ने नीरव मोदी व त्याच्या हस्तकांविरुद्ध फसवणूक, लबाडी, विश्वासघात व ‘मनी लॉड्रिंग’ची आरोपपत्रे दाखल केली आहेत. त्याआधारे ‘रेड कॉर्नर नोटीस’ जारी करण्याची विनंती ‘सीबीआय’ने ‘इंटरपोल’ या जागतिक पोलीस संघटनेस केली होती. त्यानुसार नीरव मोदी, त्याचा मामा मेहुल चौकसी व त्यांचा एक विश्वासू कर्मचारी सुभाष परब यांच्याविरुद्ध अशी नोटीस जारी करण्यात आली आहे. या नोटीसवर संबंधितांची व्यक्तिगत माहिती, शारीरिक वर्णन, छायाचित्र व त्यांच्यावरील आरोप संक्षेपाने नमूद केले आहेत. जगभरातील १९२ देश ‘इंटरपोल’चे सदस्य आहेत. नोटिशीत उल्लेख केलेली व्यक्ती कुढे आढळली तर तिला लगेच ताब्यात घेण्याची अथवा माहिती कळविण्याची विनंती त्या देशांना करण्यात आली आहे.‘पीएनबी’ने या घोेटाळ््याची फिर्याद ‘सीबीआय’कडे केली त्याच्या काही दिवस आधीच निरव मोदी पत्नी व मुलासह देश सोडून निघून गेला होता. स्वत: मोदी बेल्जियमचा तर त्याची पत्नी अमेरिकेची नागरिक आहे. या नोटिशीला यश येऊन नीरव मोदी सापडला तर त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतील. त्या देशाशी भारताचा प्रत्यार्पण करार झालेला असेल तर हे काम सुलभ होईल.पासपोर्ट रद्द केला तरी मोकाटनीरव मोदी सध्या नेमका कुठे आहे, याची नक्की माहिती नाही. मध्यंतरी तो इंग्लंडमध्ये असल्याची व तेथे राजाश्रयासाठी प्रयत्न करीत असल्याची बातमी आली होती. ब्रिटनच्या भारतात आलेल्या महिला मंत्र्यानेही मोदीच्या इंग्लंडमधील उपस्थितीस दुजोरा दिला होता. मात्र नंतर त्या दिशेने पुढे काहीच झाले नाही. भारत सरकारने पासपोर्ट रद्द करूनही मोदीने बिनदिक्कतपणे अनेक देशांच्या वाऱ्या केल्याचेही उघड झाले होते.
नीरव मोदीविरुद्ध ‘रेड कॉर्नर’ नोटीस, इंटरपोलची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 11:34 PM