करकपात केल्यानंतर खाद्यतेलाच्या किमतीत घट; प्रति लीटर ४ ते ७ रुपयांचा ग्राहकांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 01:10 PM2021-11-08T13:10:47+5:302021-11-08T13:15:02+5:30
प्रति लीटर ४ ते ७ रुपयांचा ग्राहकांना दिलासा
नवी दिल्ली : पेट्राेल आणि डिझेलसाेबतच खाद्यतेलाच्या किमतीमध्येही गेल्या काही महिन्यांमध्ये माेठी वाढ झालेली दिसून आली. खाद्यतेलाच्या वाढलेल्या किमतींपासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने करकपातीचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे थाेक बाजारात तेलाच्या किमतींमध्ये ४ ते ७ रुपयांनी घट झाली आहे. त्यात आणखी घट हाेण्याची अपेक्षा सरकारने व्यक्त केली आहे.
केंद्र सरकारने शुक्रवारी कच्चे साेयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील कृषी अधिभार १५ टक्क्यांनी कमी केला. तसेच कच्च्या पाम तेलावरील कृषी अधिभारही ७.५ टक्क्यांवर आणला. याशिवाय या तेलांवरील किमान कर शून्य टक्के केला आहे. कर कपातीनंतर कच्च्या पाम तेलावरील प्रभावी कर ८.२५ तर साेयाबीन आणि सूर्यफूल तेलांवरील कर ५.५ टक्के हाेणार आहे. खाद्यतेलांवरील आयातशुल्काचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. तसेच माेहरीच्या तेलाचे वायदेबाजारातील व्यवहार स्थगित करण्यात आले आहेत.
सरकारच्या निर्णयानंतर खाद्यतेलाची विक्री करणाऱ्या कंपन्यांनी खाद्य तेलाच्या थाेक किमतींमध्ये ४ ते ७ रुपये प्रतिलिटर एवढी कपात केली आहे. खाद्यतेलांच्या किमती भडकल्यानंतर त्याविरोधात ओरड सुरू झाल्याने सरकारने खाद्यतेलांवरील आयात करामध्ये कपात केली. त्यामुळे किमती काही प्रमाणात खाली आल्या. त्यानंतरही पुन्हा किमतींमध्ये कपात झाल्याने ऐन दिवाळीत खाद्यतेल काहीसे स्वस्त झाले होते. आता पुन्हा किमती कमी झाल्या आहेत. आता तेलबिया बाजारात आल्या असून, तेलाचे उत्पादन वाढू लागणार आहे. त्यामुळेही किमती काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सरकारच्या सूत्रांनी सांगितले, की खाद्यतेलाच्या किमती गेल्यावर्षीच्या तुलनेत अजूनही जास्त आहेत. मात्र, सध्या त्यात घट हाेताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढलेल्या असूनही सरकारच्या उपाययाेजनांचा परिणाम हाेत आहे.