नवी दिल्ली- डॉल्फिन आणि पाल यांच्यासारख्या दिसणाऱ्या इकथ्योसोर या ज्युरासिक कालीन प्राण्याचे अवशेष गुजरातमधील कच्छमध्ये सापडले आहेत. भारतात इकथ्योसोरचे अवशेष सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. इकथ्योसोर या ग्रीक संज्ञेचा अर्थ मासा-पाल (फिश-लिझर्ड) असा होतो. हे अवशेष 152 दशलक्ष वर्षांपुर्वीचे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हे इकथ्योसोर डायनॉसोरच्या काळात पृथ्वीतलावर होते. त्याचे अनेक फॉसिल्स उत्तर अमेरिका आणि युरोपात सापडले होते. तसेच दक्षिण गोलार्धात ते केवळ दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये सापडले होते.दिल्ली विद्यापिठामधील भूगर्भशास्त्रज्ञ गुंतुपल्ली प्रसाद यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले, या प्राण्याचा फॉसिल सांगाडा भारतीय आणि जर्मन संशोधकांच्या चमूला मागच्या वर्षीच कच्छमध्ये सापडला होता. पण तेव्हा ता डायनॉसोरचा सांगाडा वाटला होता. मात्र नंतर पूर्ण सांगाडा खोदून काढल्यानंतर त्याची हाडे मोठी असल्याचे दिसून आले आणि तो भारतातील पहिला इकथ्योसोर असल्याचे लक्षात आले. कच्छमध्ये सापडलेला सांगाडा साधारणतः 5.5 मी लांब असून तो ऑप्थल्मॉसोरिड फॅमिलीतील आहे. या फॅमिलीतील प्राणी 165 ते 90 दशलक्ष वर्षांपुर्वी अस्तित्वात होते. 25 ऑक्टोबरच्या PLOS ONE च्या अंकामध्ये यावर लेख लिहून प्रथमच प्रसिद्धी देण्यात आली आहे.