मुंबई- गेल्या आठवड्यात रेल्वे ट्रेनसमोर सेल्फी घेण्याच्या नादात तरूणाचा भयानक अपघात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तरूणाच्या त्या मूर्खपणाची सगळीकडे चर्चा झाली. अनेक वृत्तवाहिन्यांवर त्याचा व्हिडीओ हेडलाइन्समध्ये वापरलेला पाहायला मिळाला. हा तरूण तेलंगणामधील असून शिवा असं त्याचं नाव आहे.
शिवा सेल्फी काढत असताना धावती ट्रेन येते व शिवाला धडक देते, त्यानंतर त्याचा मोबाइल हातातून पडताना व्हिडीओमध्ये दिसतो आहे. ट्रेनच्या धडकेमुळे त्या तरूणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचं माध्यमांनी म्हंटलं. वाऱ्याच्या वेगाने पसरलेल्या या व्हिडीओ मागील सत्य मात्र वेगळंच आहे.
ट्रेनसमोर उभं राहून सेल्फी काढणाऱ्या तरूणाचा व्हिडीओ बनावट असल्याचं समोर आलं आहे. मुलाला ट्रेनने धडक दिलीच नाही. हा संपूर्ण व्हिडीओ एडिट केलेला आहे. एबीएन तेलुगू या स्थानिक वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार शिवा व त्याच्या मित्रांनी मिळून हा व्हिडीओ बनवला आहे.
ट्रेनसमोर उभं राहून काढलेला व्हिडीओ पाहून शिवा व त्याचे मित्र हसत असल्याचा एक व्हिडीओ या वृत्तवाहिनीने दाखविला आहे. या वृत्तवाहिनीत काम करणाऱ्या नूलुत्ला कविता या पत्रकारने संबंधित व्हिडीओ ट्विट केला आहे. व्हिडीओ व्हायरला झाल्यापासून जीममध्ये ट्रेनरचं काम करणारा शिवा फरार आहे, असं ट्विट त्यांनी केलं आहे.