‘इंडिया’ नाव इतिहासजमा होणार? सुप्रीम कोर्टात आज महत्त्वपूर्ण सुनावणी; संपूर्ण देशाचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 08:41 AM2020-06-02T08:41:00+5:302020-06-02T08:46:50+5:30
१९४८ मध्ये तत्कालीन प्रस्तावित अनुच्छेद १ वरून संविधान सभेत बरीच चर्चा झाली होती, असा संदर्भ याचिकेत देण्यात आला आहे.
नवी दिल्ली – संविधानातून इंडिया हा शब्द वगळून फक्त भारत ठेवावा यासाठी मागणीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. देश एक आहे तर नाव एक का नाही? असा प्रश्न याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टात या याचिकेवर आज महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. इंडिया हा शब्द गुलामीची निशाणी आहे. त्यासाठी भारत अथवा हिंदुस्थान या शब्दाचा वापर व्हावा अशी मागणी याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
घटनेतील कलम १ मध्ये सुधारणा करून इंडिया हा शब्द हटवावा असं याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. आत्ता कलम १ मध्ये म्हटलं आहे की, भारत म्हणजे इंडिया हा राज्यांचा संघ आहे. त्याऐवजी इंडिया हा शब्द काढून टाकावा आणि भारत किंवा हिंदुस्थान इतकाच ठेवावा, देशाला मूळ आणि अस्सल नावावरून भारत म्हणून ओळखले पाहिजे असं याचिकेत म्हणण्यात आलं आहे.
Supreme Court to hear today a petition seeking replacement of word 'India' with 'Bharat'. The petitioner, Namah, has sought a direction to change the English name of country INDIA to BHARAT. pic.twitter.com/1wTPhlRaSy
— ANI (@ANI) June 2, 2020
सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत असं म्हटलं आहे की, इंग्रजी नाव हटविणे हे प्रतीकात्मक असेल, परंतु ते आपल्या राष्ट्रीयत्वाबद्दल, विशेषत: भविष्यातील पिढीसाठी अभिमानास्पद असेल. वास्तविक, इंडिया या शब्दाऐवजी भारत वापरला जाणं हे स्वातंत्र्यलढ्यात आपल्या पूर्वजांच्या कठीण सहभागाचे औचित्य सिद्ध होईल. तसेच या प्रकरणात भाजपाच्या नेत्या उमा भारती यांनी दोन दिवसांपूर्वी एकामागून एक सात ट्विट केले. उमा भारती म्हणाल्या, एका देशाची किंवा व्यक्तीची दोन नावं नसतात उदा 'सूर्यप्रकाश that is सनलाइट, कोणाचे नाव असणार नाही. अशाच प्रकारे इंडिया that is भारत असं नाव असणं हे हास्यास्पद आहे.
भारत नावाचा इतिहास काय?
असं म्हटलं जातं की, महाराजा भरतने संपूर्ण भारताचा विस्तार केला. आणि या देशाचे नाव त्यांच्या नावावर ठेवले गेले. जेव्हा तुर्क आणि इराणी लोक मध्ययुगात येथे आले, त्यांनी सिंधू खोऱ्यात प्रवेश केला. त्या सिंधुचा उच्चार हिंदू झाला. हिंदूंकडून देशाला हिंदुस्थानचे नाव पडले. जेव्हा इंग्रज आले तेव्हा त्यांनी या देशाचे नाव सिंधू खोऱ्याच्या आधारे इंडिया नाव ठेवले कारण त्यांना भारत किंवा हिंदुस्थान म्हणणे गैरसोयीचे होते.
'इंडिया हे इंग्रजी नाव प्रतिकात्मक आहे. मात्र ते हटवल्यानं राष्ट्रीयत्वाचा गौरव होईल. येणाऱ्या पिढ्यांवर भारत/हिंदुस्तान शब्दामुळे अतिशय सकारात्मक परिणाम होईल. इंडियाच्या भारत शब्द वापरला गेल्यास देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्या आपल्या पूर्वजांना न्याय मिळेल,' असं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.
अनुच्छेद १ मध्ये सुधारणा करण्याची मागणी
१९४८ मध्ये तत्कालीन प्रस्तावित अनुच्छेद १ वरून संविधान सभेत बरीच चर्चा झाली होती, असा संदर्भ याचिकेत देण्यात आला आहे. त्यावेळी अनेकांनी देशाचं नाव भारत किंवा हिंदुस्थान असावं, असं मत व्यक्त केलं होतं. आता देशाला मूळ नाव देण्याची वेळ आली आहे. आपल्या देशातल्या शहरांची नावंदेखील बदलली जात आहेत, याकडेही याचिकाकर्त्यानं लक्ष वेधलं आहे.