अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपाने आघाडी घेतली आहे. आता पहिला निकालसुद्धा भाजपाच्या बाजूने लागला असून, अहमदाबादच्या एलिसब्रिज मतदारसंघातून भाजपाचे राकेश शहा 70 हजार मतांनी विजयी झाले आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी असून, सुरुवातीच्या अडीच तासांमधील कलांमध्ये काँग्रेसने सत्ताधारी भाजपाला कडवी टक्कर दिली आहे. आतापर्यंत 182 मतदारसंघांचा कल हाती आला असून, त्यामध्ये भाजपा 108 तर काँग्रेस 73 जागांवर आघाडीवर आहे.
182 जागांसाठी गुजरातमध्ये दोन टप्प्यांत सरासरी 68.41 टक्के मतदान झाले होते. 68 जागांसाठी हिमाचल प्रदेशात 75 टक्के मतदान झाले होते. गुजरातच्या 33 जिल्ह्यांतील 37 केंद्रांवर मतमोजणी होत आहे. तर, हिमाचल प्रदेशमध्ये 42 केंद्रांवर मतमोजणी होत असून, सर्वत्र कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मतदानापूर्वी आलेल्या सर्वच एक्झिट पोलमध्ये दोन्ही राज्यांमध्ये भाजपाची सत्ता बनेल असा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि गुजरात निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारं त्रिकूट म्हणजे हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी भाजपाच्या पराभवाचा दावा केला आहे. केवळ इव्हीएममध्ये घोळ करूनच भाजपा गुजरातमध्ये विजय मिळवू शकेल आणि 18 डिसेंबरच्या आधी म्हणजेच शनिवारी आणि रविवारी रात्री भाजपा ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा करेल असा आरोप हार्दिक पटेलने केला होता. ईव्हीएमध्ये गडबड झाली नाही तर भाजपाला 82 जागा मिळतील, असं हार्दिक पटेलने म्हटलं होतं.