पाटणा - राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेज प्रताप यादव यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. पत्नी ऐश्वर्या राय यांच्यापासून घटस्फोट मिळावा, यासाठी पाटणा येथील दिवाणी न्यायालयात तेज प्रताप यांनी अर्ज केल्याची माहिती आहे. त्यानंतर, तेज प्रताप रांची येथे लालू प्रसाद यादव यांना भेटण्यासाठी गेले होते. विशेष म्हणजे तेज प्रताप यांच्या लग्नाला केवळ सहाच महिन्यांचा कालावधी झाला आहे. या घटस्फोटाबाबत अद्याप कुठलेही कारण देण्यात आले नाही.
ऐश्वर्या आणि तेज प्रताप यांच्या वैवाहिक जीवनात कलह निर्माण झाला आहे. त्यामुळे तेज प्रताप यादव यांनी थेट घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. याबाबत माहिती मिळताच, ऐश्वर्या यांचे वडिल आणि बिहारचे माजी मंत्री चंद्रिका राय यांनी लालू प्रसाद यादव यांचे घर गाठले. तसेच घटस्फोटाच्या निर्णयाबाबत चर्चाही केल्याचे समजते. विशेष म्हणजे याच वर्षी 12 मे रोजी धुमधडाक्यात तेज प्रताप यांचा विवाह झाला होता. मात्र, सहा महिन्यांतच दोघांच्या नात्यामध्ये कटुता निर्माण झाली. मी ऐश्वर्यासोबतच नातं पुढे नेऊ इच्छित नसल्याचे तेजप्रताप यांनी म्हटलं आहे. दरम्यान, लालूप्रसाद यादव सध्या रांचीतील राजेंद्र इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथील पेईंग वॉर्डमध्ये आहेत. चारा घोटाळाप्रकरणी ते शिक्षा भोगत आहेत.