गडकरींचा एक कॉल अन् प्रॉब्लेम सॉल्व्ह; शिवसेना खासदारानं सांगितला लय भारी किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 06:44 AM2021-10-21T06:44:46+5:302021-10-21T06:45:13+5:30
खा. विनायक राऊत यांनी केली होती तक्रार
नवी दिल्ली : शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी चार वर्षांपासून रस्त्याचे काम रखडले असल्याची तक्रार रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. ती ऐकून गडकरी यांनी संबंधितांना फोन लावला आणि यामुळे रखडलेले काम मार्गी लागले. खा. राऊत यांनी बुधवारी गडकरी यांची भेट घेऊन मुंबई-गोवा महामार्गासाठी एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर अंतर्गत काम करणाऱ्या उपकंत्राटदारांची बिले दीर्घकाळ रखडल्याने कामही थांबले असल्याचे त्यांना सांगितले. एमईपीने उपकंत्राटदारांचे बिलांची रक्कम न दिल्याने चार वर्षांपासून कामही थंडावले आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
कंत्राटदारास आदेश
रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग -६६ च्या अरावली-कांटे आणि कांटे-वाकड विभागांसाठी एमईपीने काम घेतले होते. त्यांनी ते उपकंत्राटदारांना दिले. त्या उपकंत्राटदारांनी जे काम केले, त्यांच्या बिलांची रक्कम मात्र त्यांना देण्यात आली नाही. त्यामुळे या सहा उपकंत्राटदारांना मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, असे राऊत यांनी निदर्शनास आणून दिले आहे. गडकरी यांनी कंत्राटदारास फोन करून थकिते देण्याचे आणि काम पूर्ण करण्यास सांगितले.