बांगलादेशातीलहिंदूंवरील अत्याचार सातत्याने वाढताना दिसत आहेत. यातच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी चिंता व्यक्त करत, या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कठोर पावले उचलावीत, असे आवाहन केले आहे. जर चर्चेतून समाधान निघू शकत नसेल, तर केंद्राने दुसऱ्यावर विचार करायला हवा, असेही आंबेकर यांनी म्हटले आहे.
नागपुरात आयोजीत एका 'सकल हिंदू समाजाच्या' वतीने आयोजित एका कार्यक्रमात बोलताना बोलताना आंबेकर म्हणाले, "या प्रकरणाकडे केंद्राने अधिक गांभीर्याने बघायहा हवे आणि ठोस पावले उचलायला हवीत. मला आशा आहे की, या मुद्द्यावर संवादातून मार्ग निघेल. मात्र, चर्चा अयशस्वी ठरली तर, आपल्याला यावर दुसरे सामाधान शोधावे लागेल."
आंबेकर म्हणाले, "बांगलादेशात हिंदू समाजावर होत असलेले अत्याचार मुघल काळाची आठवण करून देणारे आहेत. तेथे आमची मंदिरे जाळली जात आहेत. लुटली जात आहेत. महिलांवर अत्याचार होत आहेत. हे सर्व पाहून प्रत्येक हिंदूला संताप यायला हवा. या घटनांची केवळ निंदा करणेच पुरेसे नाही, तर राग आणि दुःखातून बाहेर येत, पुढे जाणे आवश्यक आहे."
आंबेकर पुढे म्हणाले, "बांगलादेशात होत असलेल्या हिंसाचाराचा उद्देश तेथून हिंदू समाज उखडून टाकणे आहे. केवळ बांगलादेशच नाही, तर पाकिस्तानातही हिंदूंवर हल्ले होत आहेत. आम्ही हिंदूंवर होणारे अत्याचार सहन करणार नाही. जर आपण यावर काहीच केले नाही, तर आपल्या भावी पिढ्या आपल्या गप्प राहण्यावर प्रश्न उपस्थित करतील."
बांगलादेशचे अंतरिम नेते मुहम्मद युनुस यांच्यावर निशाणा साधताना आंबेकर म्हणाले, "ज्या देशाचे नेतृत्व नोबेल शांती पुरस्कार विजेते करत आहेत, तेथे शांतता होऊ शकत नाही. ते तेथे हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी काहीही करताना दिसत नाहीत."