नवी दिल्ली, दि. 3 - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक इंद्रेश कुमार यांनी गायीच्या शेणानं बंकरही बनवता येऊ शकतं, असं विधान केलं आहे. तसेच गायीच्या मूत्रापासून कॅन्सर सारख्या दुर्धर रोगावरही उपाय करता येऊ शकतो, असंही ते म्हणाले आहेत. चंदीगडमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी गायीवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. गोमांस हे विषासारखं आहे, गायीचे गोमूत्र व शेण हे उपयोगी असून, त्यापासून सैन्याला बंकरही बनवता येऊ शकतात. भारतातील अनेक खेड्यांमधील जमिनी सारवण्यासाठी आणि भिंती लिंपण्यासाठी शेणाचा सर्रास उपयोग केला जातो. लष्कर बंकर्स बनवण्यासाठीही शेणाचा वापर करू शकते, असे इंद्रेश कुमार म्हणाले आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी एका इफ्तार पार्टीत मुस्लिमांनी मांस खाणे सोडलं पाहिजे, असं मत मांडलं होतं. जगामधील 90 टक्के लोक हे गायीच्या दुधावर निर्भर आहेत. गायीला माता म्हणूनही संबोधले जाते. गाय विषारी घटकांचं सेवन करते आणि शुद्ध दूध आणि शेण देते. गोमूत्रातही आयुर्वेदिक औषधी गुण असल्यानं कॅन्सरसारखा रोगही बरा होऊ शकतो, असंही इंद्रेश कुमार म्हणाले आहेत. प्रेषित आणि त्यांच्या अनुयायांनी कधीच मांस खाल्लं नाही. त्यामुळे मुस्लिमांनी मांस खाणं सोडून द्यावं, असे कुमार काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.गायीपासून मिळणा-या उत्पादनांच्या संशोधनासाठी देशभरातील 50 संशोधन संस्थांनी आयआयटी दिल्लीकडे आपले प्रस्ताव पाठवले आहेत. स्वरुप हा प्रकल्प (सायंटिफिक व्हॅलिडेशन अॅंड रिसर्च ऑन पंचगव्य) खास गायीपासून मिळणाऱ्या उत्पादनांच्या संशोधनासाठी तयार सुरु करण्यात आला आहे. पंचगव्यामध्ये गायीचे दूध, दही, गोमय, गोमूत्र आणि तूप यांचा समावेश होतो. आम्हाला सीएसआयआर प्रयोगशाळा, एनआयटी, आयआयटी अशा संस्थांकडून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. अद्याप कोणत्याही संशोधन प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलेली नाही, असे आयआयटी दिल्लीच्या ग्रामविकास आणि तंत्रज्ञान विभागाच्या व्ही. के विजय यांनी स्पष्ट केले होते. मागील वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये आयआयटी दिल्लीमध्ये स्वरुप वरती विचारमंथन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पंचगव्याचा शेती, कुपोषण, साबण-डासप्रतिबंधक औषधांसारखी ग्राहकोपयोगी उत्पादनांसाठी कसा उपयोग होईल यावर चर्चा करण्यात आली होती. आता भारतीय गायींचे वेगळेपण आणि परदेशी गायींच्या तुलनेमध्ये त्यांच्यापासून मिळणाऱ्या उत्पादनांची उपयुक्तता याचा अभ्यास करण्याचा विचार सरकारचा असल्याचे सांगण्यात येत होते.
गायीच्या शेणानं बनू शकते बंकर, कॅन्सरवर उपाय शक्य- इंद्रेश कुमार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2017 3:00 PM