केंद्रपाडा (ओडिशा) : ओडिशाची किनारपट्टी गिळंकृत होऊ लागल्यामुळे आॅलिव्ह रिडले या दुर्मिळ कासवांसाठी सुरक्षित मानले जाणारे जगातील सर्वात मोठे ‘गहीरमाथा’ हे स्थानही धोक्यात आले असून तेथे दरवर्षी सामूहिकरीत्या अंडी घालण्यासाठी होणारी कासवांची गर्दी ओसरू लागली आहे.आॅलिव्ह रिडले या कासवांची यावेळी कमी झालेली गर्दी चिंतेचा विषय बनली आहे. किनारपट्टीवरील वाळूच्या खड्ड्यांमध्ये अंडी घालण्यासाठी मादी कासवे समुद्रातून सरपटत येत असतात. या महिन्यात अलीकडे या कासवांची गर्दी तुलनेत कितीतरी कमी असून १६ मार्चपासून केवळ ५१,७४८ मादी कासवांनी किनारा ओलांडल्याची नोंद झाली आहे. कासवांनी १९ मार्च रोजी सर्वाधिक गर्दी केली; मात्र नंतर ही संख्या झपाट्याने कमी होत गेली. गेल्या चार दिवसांमध्ये तर एकही कासव किनाऱ्यावर फिरकले नसल्याचे वन्यजीव विभागाचे अधिकारी बिमल प्रसन्ना आचार्य यांनी सांगितले. गेल्यावर्षी सुमारे ४.१३ लाख मादी कासवांनी किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी घरटी केली होती. ही संख्या कमी होण्यामागच्या कारणांचा अभ्यास करण्याची जबाबदारी कासव तज्ज्ञांकडे सोपविण्यात आल्याचे आचार्य यांनी नमूद केले. (वृत्तसंस्था)मातेशिवाय वाढतात कासवे... आॅलिव्ह रीडले कासवांनी किनाऱ्यावरील वाळूंच्या घरट्यांमध्ये अंडी घालण्याच्या या प्रक्रियेला अर्रीबाडा असे संबोधले जाते. अंडी घातल्यानंतर मादी कासवे खोल समुद्रात निघून जातात. ४५-६० दिवसानंतर अंडी फोडून पिले बाहेर येऊ लागतात. मातेशिवाय वाढणारी कासवांची पिले ही दुर्मीळ नैसर्गिक प्रक्रिया आहे.सागरी लाटांमुळे किनाऱ्याची मोठी झीजगहीरमाथा बीचवरील निर्मनुष्य नासी-२ बेटाचा बराच भाग समुद्राने गिळंकृत केला आहे. सागरी लाटांमुळे किनाऱ्याची झीज होऊ लागते. गेल्या वर्षीच्या तुलनेत बेटाचा भाग तीन हेक्टरने कमी झाला आहे. यावेळी कासवांच्या गर्दीला अनुकूल स्थिती नाही. अंडी घालण्यासाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वाळूच्या खड्ड्यांचा आकारही बिघडू लागला आहे. समुद्राच्या लाटांमुळेही कासवांच्या सरपटण्यावर प्रतिकूल परिणाम होत असतो. बरेचदा कासवे अंडी न घालताच समुद्रात परततात, असे गहीरमाथा सागरी अभयारण्यातील वन क्षेत्रीय अधिकारी सुब्रत पात्रा यांनी सांगितले.असा कमी झाला किनारावर्ष २०१५- बीच एरिया १२.५४ हेक्टर. वर्ष २०१६- बीच एरिया ९.६६ हेक्टर (वर्षभरात ३ हेक्टर कमी)
दुर्मिळ आॅलिव्ह रिडले कासवांची गर्दी ओसरू लागली
By admin | Published: March 29, 2016 2:46 AM