रशियाकडून तातडीने लढाऊ विमानांची खरेदी केली जाणार; मनोज नरवणेंसह हवाई दलाच्या प्रमुखांनी घेतली राजनाथ सिंहांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 03:38 AM2020-06-27T03:38:14+5:302020-06-27T03:38:37+5:30
चीनने नियंत्रण रेषा चार किमीपर्यंत बदलण्याचा कट भारतीय जवानांनी उधळून ड्रॅगनला त्याची जागा दाखवली आहे.
टेकचंद सोनावणे
नवी दिल्ली : लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी शुक्रवारी उशिरा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. घुसखोरी सुरूच ठेवण्याचा ड्रॅगनचा कट भारतही उधळून लावण्यास सज्ज असून, काहीही झाले तरी चीनला धडा शिकवण्यावर संरक्षण मंत्रालयात एकमत झाले आहे. आजच्या बैठकीत हवाई दलाचे प्रमुखही या वेळी उपस्थित होते. चीनच्या तुलनेत लष्कर व हवाई दलाच्या क्षमतेची माहिती राजनाथ सिंह यांना दोन्ही प्रमुखांनी दिली. चीनने नियंत्रण रेषा चार किमीपर्यंत बदलण्याचा कट भारतीय जवानांनी उधळून ड्रॅगनला त्याची जागा दाखवली आहे.
गलवान खोऱ्यात तैनात अधिकाऱ्यांशी चर्चा करून आलेल्या लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी तेथील स्थितीची सविस्तर माहिती शुक्रवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना दिल्यानंतर पुढील रणनीती काय असावी, हे ठरविण्यात आले. त्यानुसार रशियाकडून तातडीने लढाऊ विमानांची खरेदी केली जाणार असून, पुढील पंधरा दिवस प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर हवाई गस्त वाढवली जाईल.
>आर्थिक दणका
ऊर्जा मंत्रालय चीनला आर्थिक आव्हान देणारे पहिले मंत्रालय ठरले आहे. सौर ऊर्जा उपकरणांच्या सुट्या भागांच्या नियार्तीवर ऊर्जा मंत्रालयाने निर्यात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा १५ टक्के तर पुढच्या वर्षी ही वाढ किमान ४० टक्क्यांपर्यंत नेली जाईल.
भारतीय उद्योजकांना प्रोत्साहन देणे व चीनवरील अवलंबित्व कमी करण्याचा उद्देश त्यामुळे साध्य होईल. केंद्रीय मंत्र आर.के. सिंह यांनी या निर्णयाची घोषणा केली. लोकमतने २२ जून रोजीच या संबधीचे वृत्त प्रसिद्ध केले होते.