प्रद्युम्नच्या हत्येनंतर 10 दिवसांनी सुरू झाली रायन इंटरनॅशनल स्कूल; शाळा उघडण्याच्या निर्णयाला प्रद्युम्नच्या वडिलांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 09:59 AM2017-09-18T09:59:15+5:302017-09-18T13:52:38+5:30
गुरूग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूल सोमवारी सकाळी पुन्हा उघडली.
गुरूग्राम, दि. 18- गुरूग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूल सोमवारी सकाळी पुन्हा उघडली. शाळेच्या 7 वर्षीय विद्यार्थी प्रद्युम्न याच्या हत्येनंतर 10 दिवसांनी शाळा पुन्हा सुरू झाली. पण शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला प्रद्युम्नचे वडील वरूण ठाकूर यांनी विरोध केला आहे. प्रद्युम्नची हत्या झाल्यानंतर शाळेकडून पुराव्यांशी छेडछाड करण्यात आली, रक्ताचे डाग मिटविण्याचे प्रयत्न करण्यात आले. तरीही शाळा कशी सुरू केली जाऊ शकते? असा सवाल प्रद्युम्नच्या वडिलांनी उपस्थित केला आहे. गुरूग्राम पोलीस ठाण्याचे उपायुक्त विनय प्रताप सिंह सध्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये पोहचले आहेत.
Gurugram: #RyanInternationalSchool reopens for students for the first time after the murder of 7-year-old #Pradyuman inside school premises. pic.twitter.com/nG5y1OoYkR
— ANI (@ANI) September 18, 2017
मुलांमध्ये भीतीचं वातावरण
रायन इंटरनॅशनल स्कूल सोमवारी सकाळी सुरू झाली. मुलांनी शाळेत हजेरी लावली. पण शाळेत आलेल्या मुलांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतं आहे. शाळेत आल्यानंतर खूप भीती वाटते आहे. पण शाळा पुन्हा सुरू झाली म्हणून यावं लागलं,अशी प्रतिक्रिया मुलांकडून मिळते आहे. मुलांच्या अभ्यासाचं नुकसान होऊ नये, यासाठी त्यांना शाळेत घेऊन आल्याचं पालकांनी सांगितलं आहे. सकाळी शाळेमध्ये आलेली एक मुलगी रडायला लागली आणि भीतीमुळे ती वर्गात बसायला तयार नव्हती. यामुळे तिचे पालक तिला पुन्हा घरी घेऊन गेले. तर काही पालकांनी आज मुलांना शाळेत न पाठवणं पसंत केलं. शाळेतील सुरक्षा व्यवस्था नीट असल्याची खात्री करूनच मुलांना शाळेत पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर शाळेत गेलेली आमची मुलं पुन्हा घरी येईपर्यंत मनात भीतीचं असेल, असं काही पालकांनी सांगितलं.
प्रद्युम्नच्या वडिलांनी व्यक्त केली नाराजी
प्रद्युम्नच्या हत्येनंतर दहा दिवसांनी शाळा सुरू केल्याच्या निर्णयावर प्रद्युम्नच्या वडिलांनी नाराजी व्यक्त करत निर्णयाला विरोध केला आहे. जोपर्यंत हत्येचा तपास पूर्ण होत नाही. तोपर्यंत शाळा प्रशासन शाळा कशी सुरू करू शकतं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याप्रकरणी वरूण ठाकूर म्हणाले, या संपूर्ण घटनेत शाळेतील काही लोक सहभागी आहेत. जर शाळा पुन्हा सुरू केली तर ती लोक पुराव्यांशी छेडछाड करण्याची शक्यता आहे.
कोर्टाने सरकारला पाठवली नोटीस
सुप्रीम कोर्टाने शाळेतील सुरक्षेच्या मुद्द्यावर केद्र सरकार आणि राज्य सरकारकडून उत्तर मागितलं आहे. कोर्टाने नोटीस जारी करत, शाळांमध्ये सुरक्षेच्या मुद्द्यावर काय पाऊलं उचलली जात आहेत? असा सवाल विचारला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने तीन आठवड्यात यावर उत्तर देण्याचंही सुप्रीम कोर्टाने म्हंटलं आहे. गुरूग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रद्युम्नची हत्या झाल्यानंतर शाळांमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
नेमकं प्रकरण काय ?
गुरूग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये 8 सप्टेंबर रोजी दुसरीत शिकणाऱ्या प्रद्युम्नची हत्या झाली. शाळेच्या स्वच्छतागृहात रक्ताच्या थारोळ्यात प्रद्युम्नचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी शाळेच्या बसचा कंडक्टर अशोक याच्यासह तीन जणांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांकडून झालेल्या तपासणीत आरोपी अशोक कुमार याने गुन्ह्याची कबूली दिली.