तिरुवनंतपुरम - केरळमधील प्रसिद्ध शबरीमला मंदिरात बुधवारी (2 जानेवारी) पहाटेच्या सुमारास दोन महिलांनी प्रवेश केला. पोलीस संरक्षणात या महिलांना भगवान अय्यप्पांचे दर्शन घेतले. गेल्या अनेक शतकांपासून चालत आलेली महिला प्रवेशबंदीची परंपरा या महिलांनी मोडून इतिहास घडवला आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ हिंदू परिषदेनं आज 'केरळ बंद'ची हाक दिली आहे.
दरम्यान, या घटनेबाबत भाजपा नेते व्ही मुरलीधरन यांनी वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे. ''ज्या महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश केला, त्या भाविक नसून माओवादी होत्या'', असे वादग्रस्त विधान भाजपाचे नेते व्ही मुरलीधरन यांनी केले आहे.
मुरलीधरन पुढे असेही म्हणाले की, निवडक पोलिसांना हाताशी घेऊन कम्युनिस्ट पार्टीनं महिला मंदिर प्रवेशाची योजना आखली, तेव्हाच या महिलांनी मंदिरात प्रवेश केला. केरळ सरकार आणि कम्युनिस्ट पार्टीनं आखलेले हे सुनियोजित असे षड़यंत्र आहे. भाजपाच्या नेत्याच्या या विधानामुळे हा वाद अधिक चिघळण्याची चिन्हं आहेत. दरम्यान, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा केरळमध्ये अनेक ठिकाणी निदर्शने आणि राष्ट्रीय महामार्गांवर रास्तारोको सुरू आहे.
(समानतेचा विजय!, सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाचं तृप्ती देसाईंनी केलं स्वागत)
(Video: इतिहास घडला, अखेर शबरीमला मंदिरात दोन महिलांनी प्रवेश केला)
याबाबत, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितले की, महिलांना अय्यप्पा मंदिरात केलेला प्रवेश ही स्त्रीसमानतेसाठी मोठी घटना आहे. अय्यप्पा मंदिरात 10 ते 50 वर्षे वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्यात यावा, या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अंमलबजावणीला अय्यप्पा भक्त, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र विरोध चालवला आहे.
अय्यप्पा मंदिरा प्रवेश करणाऱ्या महिला कोण?
कनकदुर्गा (वय 44 वर्ष) आणि बिंदू (वय 42 वर्ष) अशी या महिलाभक्तांची नावे आहेत. पारंपरिक पद्धतीचे काळ कपडे परिधान करुन या महिलांनी बुधवारी पहाटे 3.38 वाजण्याच्या सुमारास अय्यप्पा मंदिरात प्रवेश केला. दर्शनानंतर कनकदुर्गा आणि बिंदू या दोघींना पोलीस संरक्षणात अज्ञात स्थळी नेण्यात आले. बिंदू प्राध्यपिका आणि कोळीवाडा येथील कम्युनिस्ट कार्यकर्त्या असून, त्यांच्या निवासस्थानी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर कनकदुर्गा यां मल्लपूरम येथे नागरी पुरवठा खात्यात कर्मचारी आहेत.
महिला प्रवेशानंतर मंदिराचे शुद्धीकरण
या महिलांनी मंदिरात प्रवेश केल्यानंतर येथील मुख्य पुजाऱ्यानं सर्व भक्तांना बाहेर काढले आणि शुद्धीकरणासाठी मंदिर एक तासभर बंद ठेवले. या पुजाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्रावणकोर देवस्थान मंडळाने म्हटले आहे.