तिरुवनंतपुरम - केरळमधील प्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायायालयाने देऊन महिला उलटून गेला आहे. मात्र या मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या वादावर तोडगा काढण्यासाठी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र मंदिराच्या परंपरांचा हवाला देत काँग्रेस आणि भाजपाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे अजून काही वेळ मागण्याचा सल्ला केरळ सरकारला दिला आहे. तसेच या दोन्ही पक्षांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून वॉकआऊट केले. त्यामुळे ही सर्वपक्षीय बैठक निष्फळ ठरली. मात्र काँग्रेस आणि भाजपाकडून विरोध असला तरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून सबरीमाला मंदिरामध्ये सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यावर केरळ सरकार ठाम आहे. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी मंदिरातील महिलांच्या प्रवेशाविषयी निश्चित धोरण तयार करण्यासाठी काही नियम बदलण्याचेही संकेत दिले आहेत. भगवान अयप्पा यांच्या सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलानां प्रवेश देण्यात यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने 28 सप्टेंबर रोजी दिले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केरळ सरकार सबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाविषयी निश्चित धोरण तयार करण्यासाठी काही नियम बदलण्याच्या विचारात आहे. तसेच महिलांच्या मंदिर प्रवेशासाठी दिवस निश्चित करण्याचाही पर्याय सरकारसमोर आहे. मात्र सर्वपक्षीय बैठकीतून काँग्रेस आणि भाजपाने केलेल्या वॉकआऊटनंतर केरळ सरकारसमोरील पर्यायांना मर्यादा आल्या आहेत. काँग्रेस आणि भाजपाकडून मंदिराच्या परंपरेचा हवाला देण्यात येत आहे. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालायाच्या आदेशाचे पालन करण्याचा दबाव डाव्या पक्षांच्या सरकारवर आहे.
सबरीमाला प्रकरणी काँग्रेस-भाजपामध्ये एकमत, केरळमधील सर्वपक्षीय बैठक निष्फळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 5:59 PM