तिरुवनंतपूरम : शबरीमाला मंदिरामध्ये सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश द्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही केरळमध्ये तणाव सुरू आहे. शुक्रवारी सुद्धा महिलांना मंदिरामध्ये प्रवेश करता आला नाही. निदर्शकांनी केलेल्या विरोधामुळे मंदिरात जाण्यासाठी पोलिसांच्या गराड्यात निघालेल्या दोन महिलांना परतावे लागले. पोलीस सुद्धा विरोध करणाऱ्या भाविकांना हटवू शकले नाहीत.
दुसरीकडे केरळ सरकारने सांगितले की, मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना जाण्यास परवानगी आहे. मात्र, काही कार्यकर्ते सुद्धा यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला आम्ही परवानगी देऊ शकत नाही. आज दोन महिला मंदिराच्या प्रवेश द्वारापर्यंत गेल्या होत्या. त्यामधील एक महिला कार्यकर्ता होती.
दरम्यान, सकाळी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन महिला पत्रकार हेल्मेट घालून पोलिसांच्या गराड्यात पोहोचल्या होत्या. मात्र, 250 पोलिसांसह महिलांना निदर्शने करणाऱ्यांनी विरोध करत मंदिरात प्रवेश करु दिला नाही. अखेर, पोलीस आणि महिलांनी माघार घ्यावी लागली.
महिलांनी परत जावे अन्यथा आम्ही मंदिराची दारे बंद करू असा इशारा मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी दिला आहे. माझा भक्तांना पाठिंबा आहे. मंदिराला कुलूप लावून चाव्या द्यायच्या आणि येथून निघून जाण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. याशिवा कोणातही पर्याय नाही, असे मुख्य पुजारी कंदारू राजीवारू यांनी सांगितले.
हिंदू संघटनांचा केरळात बंदशबरीमाला डोंगरावरील प्रसिद्ध आयप्पा मंदिरामध्ये सर्व वयाच्या महिलांना प्रवेश खुला करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या निषेधार्थ गुरुवारी विविध हिंदू संघटनांनी केरळमध्ये बंद पाळला. त्यामुळे राज्यात बस, रिक्षा सेवा ठप्प झाली होती तर काही ठिकाणी राज्य परिवहन मंडळाच्या बसेसवर दगडफेक झाल्याचेही प्रकार घडले.